पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics News :  देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा  उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. निवडणूक झाल्यावर ते ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले, असे मुनगंटीवार म्हणाले. 

सुरेंद्र गांगण | Updated: May 14, 2023, 11:22 AM IST
पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट title=

Maharashtra Politics News : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठीच झाला, असा गौप्यस्फोट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. (Sudhir Mungantiwar on Uddhav Thackeray) 'झी 24 तास'शी बोलताना त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपशी युती करुन निवडून आल्यावर उद्धव ठाकरे ज्याप्रकारे वागले, त्यांना धडा शिकवण्यासाठी अजित पवार यांचे समर्थन घेतले आणि शपथविधी घडवून आणला, असे मुनगंटीवार म्हणाले. 

'ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला'

हा पहाटेचा शपथविधी म्हणजे एक राजकीय खेळी होती. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी तसे घडवून आणले. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अवमान केला. त्यांनी निवडणूक आमच्यासोबत लढवली होती. परंतु त्यानंतर विश्वासघात केला. यामुळे हे एक राजकीय ऑपरेशन होते. हा गमिनी कावा होता. उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी तसा निर्णय घेण्यात आला होता, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे आता शिवसेना काय प्रत्युत्तर देणार याचीही उत्सुकता आहे.

पहाटेचा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठीच, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

 युती म्हणून निवडणूक लढवली होती..

आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. पंतप्रधान मोदी यांच्या नावावर मते मिळाली होती. मात्र, निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे कसे वागले, हे आपण पाहिले आहे. त्यांनी शिवसैनिकांचा अवमान केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान केला होता. शिवसैनिकाला सोडून स्वत: मुख्यमंत्री झाले होते. मग अजित पवार सोबत येण्यास तयार झाले. यामुळे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, असे समजून तो शपथविधी झाला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी दावा करताना म्हटले आहे. 

दरम्यान, पहाटेच्या शपथविधीमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता, असे वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते. आता सुधीर मुनगंटीवार यांनी हा शपथविधी उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी होता, असे म्हटल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. 

23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या. दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही, म्हणत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी उभीर केली होती. तर शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिलाच नाही, यावर भाजप नेते ठाम होते. यामुळे भाजप आणि अजित पवार गट यांचा शपथविधी झाला होता. आता त्यावरुन पुन्हा एकदा वादळ उठले आहे.