संप मागे घेतला तरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, नगरमध्ये चालकाची आत्महत्या

ST strike : एसटी कामगार संघटनांनी संप मागे घेतला तरी एसटी कर्मचारी (ST employees) संपावर ठाम आहते. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे.  

Updated: Oct 29, 2021, 12:11 PM IST
संप मागे घेतला तरी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच, नगरमध्ये चालकाची आत्महत्या  title=
प्रातिनिधिक फोटो

कोल्हापूर, अहमदनगर, रायगड : ST strike : एसटी कामगार संघटनांनी संप मागे घेतला तरी एसटी कर्मचारी (ST employees) संपावर ठाम आहते. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. या संपाचा कोल्हापूर, रायगड एसटी सेवेवर परिणाम झाला आहे. एसटी विलीनिकरणाच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. कोल्हापुरात 50 टक्के तर रायगडात पूर्णपणे एसटी सेवा ठप्प आहे. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी चालकाने आत्महत्या केल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा रोष आणखीनच वाढला आहे. (driver committing suicide in Ahmednagar)

एसटी कामगार संघटनांनी आपला संप मागे घेण्याची घोषणा काल रात्री केली असली तरी एसटी कर्मचारी अजूनही संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. कोल्हापूर, रायगडमध्ये एसटी सेवा बंद करण्यात आल्याने प्रवासी सेवेवर परिणाम होत आहे. रायगड जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प आहे तर कोल्हापुरात 50 टक्के एसटी सेवा बंद करण्यात आली आहे.

राज्य सरकारने काही मागण्या मान्य केल्या असल्या तरी एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाची मागणी कायम आहे. ती मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शेवगाव इथं एसटी कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्येमुळे कर्मचारी अधिकच संतप्त झाले आहेत.  

एसटी चालकाची आत्महत्या

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावात एसटी चालकाने आत्महत्या केलीये. दिलीप हरिभाऊ काकडे असं मृत बस चालकाचं नाव आहे. डेपोत उभ्या असलेल्या एसटीच्या मागील बाजूस त्यांनी काल गळफास घेतला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वसईत एसटी आगारातच बस 

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येने एसटी कर्मचाऱ्यांचा रोष आणखीनच वाढला आहे. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे. विलीनिकरणावणाच्या मुद्द्यावर एसटी कर्मचारी ठाम आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कृती समितीने दर्लक्ष केल्याने एसटी कर्मचारी पेटून उठलेत. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आज वसईतल्या एसटी आगारातून एकही बस निघाली नाही. 

नगरमधल्या एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येचे पडसाद सोलापुरातही उमटले.  काल एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला असला तरी सोलापूर आगारात कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. कृती समीतीने घेतलेल्या भूमीकेलाही या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. तर कोल्हापूर एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनाची धग पुन्हा वाढली आहे. शेवगावमधील कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पुन्हा आंदोलन सुरु करण्यात आले आहे. कोल्हापुरातील अनेक कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.