नितीन गडकरींच्या पत्रानं शिवसेनेत वादळ, अजितदादांनीही टोचले शिवसेनेचे कान

 या वादाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही (Ajit Pawar) शिवसेनेचे कान टोचण्याची संधी साधली.

Updated: Aug 15, 2021, 11:10 PM IST
नितीन गडकरींच्या पत्रानं शिवसेनेत वादळ, अजितदादांनीही टोचले शिवसेनेचे कान title=

मुंबई : स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी विकासकामात आडकाठी आणतायेत, अशा आशयाचं तक्रार करणारं पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं. राज्यातील महामार्गांच्या कामावरुन गडकरींचे आरोप जिव्हारी लागल्यानं शिवसेना नेत्यांनी सारवासारव सुरू केलीय. या प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेचे कान टोचलेत. (deputy chief minister ajit pawar criticized to shivsena leaders over to letter of union minister nitin gadkari) 

आम्ही शेतकरी हितासाठी भांडलो, रस्त्याच्या कामात आडकाठी आणण्यासाठी नव्हे, अशा शब्दांत वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत. तर महामार्गाच्या कामात शिवसेनेनं कुठेही अडथळा निर्माण केला नाही. गडकरींना पत्र लिहून तसं कळवणार असल्याचं वाशिमचे पालकमंत्री, राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलं. या वादाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही शिवसेनेचे कान टोचण्याची संधी साधली.

दरम्यान नितीन गडकरींचं पत्र मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कारवाईचे आदेश दिलेत. मात्र पत्राचा रोख शिवसेना नेत्यांना चांगलाच झोंबलाय. त्यामुळेच आता शिवसेना नेत्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतलीय की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.