आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी करणं पडलं महागात; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची बदनामी होत असल्याचे म्हटले जात आहे

Updated: Dec 26, 2022, 02:37 PM IST
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची बदनामी करणं पडलं महागात; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल title=
ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : राज्यातील सत्तातरापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहे. यासोबत त्यांचे समर्थकही एकमेकांच्या विरोधक नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांनी केलेल्या विधानांमुळे चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा आहे. मात्र आता तानाजी सावंत यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या पाच जणाविरुद्ध भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हाट्सअप ग्रुप व फेसबुक पेजवर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भूम तालुका अध्यक्ष बालाजी गुंजाळ यांनी याप्रकरणी तक्रार दिली होती.
 
बालाजी गुंजाळ यांच्या तक्रारीनंतर अर्जुन शिंदे, जितेंद्र रायकर ,आर्यन पाटील, रोशनी शिंदे पवार यांच्यावर तानाजी सावंत यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी सावंत यांच्या विषयी वादग्रस्त पोस्ट करणारे ठाकरे गटाचे असल्याचा आरोपही गुंजाळ यांच्यातर्फे करण्यात आला आहे.
 
धाराशिव जिल्ह्यात सध्या शिंदे सेना व ठाकरे सेना यांच्यामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो आहे. सोशल मीडियावर ही हा सामना दररोज रंगताना दिसतो आहे. या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अद्याप पर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही.

हाफकिनबाबत केलेल्या वक्तव्यानंतर ट्रोल

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयात डॉक्टरांना हाफकिन नावाच्या माणसाकडून औषध घेणं बंद करा असे तानाजी सावंत यांनी म्हटल्याचे दावा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात येत होतं. यावर प्रत्युत्तर देताना तुम्हाला अंगठाछाप मंत्री दिसतो का? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला होता.