अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन सोपी गोष्ट नव्हे, यातून सावरायला वर्षभर लागेल- पवार

'कोरोनाचं संकट अतिशय चिंताजनक असून याचा व्यापारावरही मोठा परिणाम झाला आहे'

Updated: Jul 7, 2020, 07:30 PM IST
अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन सोपी गोष्ट नव्हे, यातून सावरायला वर्षभर लागेल- पवार title=
संग्रहित फोटो

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गेले अनेक दिवस मार्केट बंद आहे. मार्केट सुरु करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. पुण्यातील मार्केट सुरु करण्याबाबत येत्या काही दिवसांत निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रपरिषदेत बोलताना सांगितलं. शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यातील व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.

कोरोनामुळे देशाला जबरदस्त किंमत मोजावी लागत असून, देशाचं मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. कोरोनाचं संकट अतिशय चिंताजनक असून याचा व्यापारावरही मोठा परिणाम झाला आहे. अर्थव्यवस्थेचं पुनर्जीवन सोपी गोष्ट नसून, यातून सावरायला वर्षभर तरी लागेल, असं पवार यावेळी म्हणाले.

पुणे विविध प्रकारच्या व्यापाराचं केंद्र आहे. शहरात केंद्रित असलेला व्यापार विकेंद्रित स्वरुपात करावा, राज्य सरकारने त्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, पुणे परिसरात कायस्वरूपी एक्सिबिशन सेंटर असावं, अशा व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत. व्यवसाय पूर्ववत व्हावा या दृष्टिकोनातून परवानगी मिळवी, त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यास व्यापारी महासंघ तयार असल्याचं पवारांनी सांगितलं. व्यापाऱ्यांच्या या मागण्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच राज्य सरकारच्या कानावर घालणार असून येत्या काही दिवसांत यावर निर्णय होईल असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं.