पालघरः विरार वैतरणा (Virar-Vaitarna Railway Station) रेल्वेस्थानकादरम्यान वादळी वाऱ्यामुळे ओव्हर हेड वायरचे पोल तुटल्याची घटना आज दुपारी घडली आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेची (Western Railway) वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काल रात्रीपासूनच वादळी वारा सुरू झाला होता. त्याचा फटका आता रेल्वेलादेखील बसला आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार व वैतरणा रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी पावणे तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे विजेचा पोल पडला असल्याची माहिती मिळत आहे.
वैतरणा आणि विरारच्यामध्ये वाढीव कसराळीच्यामध्ये नवीन ट्रॅकचे काम सुरू आहे. या ट्रॅकचं काम करताना चालू ट्रॅक्टर पोल पडल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. तर, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन सुरू आहेत.
ओव्हरहेड वायरचा पोल पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकल, माल गाड्या, लांब पल्ल्याच्या ट्रेन सेवा विस्कळल्या आहेत. पोल लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी रेल्वेची यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र, रेल्वेची वाहतूक कधी सुरुळीत होईल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळाने रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. येत्या २४ तासांत हे वादळ अधिक तीव्र होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केरळातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्याच्या समुद्रातही उंच लाटा उसणार आहेत. वलसाड येथील तिथल किनाऱ्यावरही उंचच उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली. ही संपूर्ण परिस्थिती पाहता हा समुद्रकिनारा 14 जूनपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
लोकलच्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील रूळ पाहणी आणि दुरूस्ती, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामं पूर्ण करण्यासाठी हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल.हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे