Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेलं बिपरजॉय हे चक्रिवादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासू मैलोंच्या अंतरानं दूर असलं तरीही या वादळाचे परिणाम मात्र राज्यातील हवामानावर आणि पर्यायी राज्यातील मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येत आहेत. सध्याच्या घडीला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे वादळ गुजरातच्या किनारपट्टी भागातून पुढे कराचीच्या दिशेनं वळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
15 जून रोजी सायंकाळच्या सुमारास हे वादळ अधिक तीव्र रुपात येणार असून, याचा फटका गुजरात ते कराचीदरम्यानच्या किनाऱ्यांना बसणार आहे. ज्या धर्तीवर सध्या बचाव पथकं आणि सर्वच यंत्रणा तैनाक ठेवल्या असून प्रशासनही या वादळावर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, वादळ महाराष्ट्रापासून दूर गेलं असलं तरीही त्याचे परिणाम मात्र राज्यात कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 48 तासांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा सुटणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर काही भागांमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरीही हा पाऊस क्षणिकच असेल हेसुद्धा तितकंच खरं.
#WATCH | Visuals from Jakhau Port in Bhuj, where a large number of boats have been parked as fishing has been suspended in the wake of #CycloneBiparjoy.
Cyclone 'Biparjoy' is expected to cross near Gujarat's Jakhau Port by the evening of 15th June pic.twitter.com/KA7OKJE68O
— ANI (@ANI) June 14, 2023
Skymet या खासही हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 आठवड्यात कमी प्रमाणात पाऊस पडेल. ज्यामुळं शेतीच्या कामांसाठी पावसाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांची काळजी वाढणार आहे. पुढील 4 आठवड्यांसाठी म्हणजेच थेट 6 जुलैपर्यंत कमी पाऊस पडणार आहे. सहसा शेतीच्या कामांना जून महिन्यातच सुरुवात होते. पण, आता मात्र हीच कामं जुलै महिन्यावर जाणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत.
केरळात काहीसा उशिरानं पोहोचलेला मान्सून महाराष्ट्रात आला खरा. पण, अजूनही त्यानं कोकणची वेस ओलांडलेली नाही. ज्यामुळं मान्सूनसम वातावरण पाहायला मिळत असलं तरीही तो अद्यापही अपेक्षित वेगानं पुढे सरकत नसल्याचच स्पष्ट होत आहे. परिणामी येत्या दोन दिवसांमध्ये तो पुन्हा एकदा चांगल्या वेगानं प्रवास सुरु करून साधारण 18 जूनपर्यंत मुंबईत पूर्णपणे सक्रिय होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं आता मान्सूनची वाट पाहण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय आपल्या हातात नाही असंच म्हणावं.