मुंबई : आपल्यासोबत बऱ्याचदा असे घडते की, व्यवहार करताना काही तांत्रिक अडचणींमुळे मध्येच हा व्यवहार पूर्ण होत नाही आणि आपले पैसे त्यात अडकतात. मग आपण हे पैसे कसे आणि कुठून मिळवता येतील यासगळ्या गोष्टींच्या शोधात असतो. परंतु अशा वेळी जर अडकून पडलेले तुमचे पैसे परत मिळवून देण्याचं आश्वासन देत एखादा फोन आला, तर वेळीच सावध व्हा. कारण राज्यात सध्या रिफंडच्या नावानं गंडा घालणारी एक टोळी सक्रीय आहे. ही टोळी तुमचा ओटीपी न मागताही तुमचं बँक खातं रिकामं करण्याचं ट्रीक वापरते.
विशेष म्हणजे, यामध्ये ही टोळी तुमच्याकडून ओटीपी मागत नाही. आपण कोणालाही ओटीपी दिला नसल्यानं आपणही निर्धास्त असतो आणि बाकीची सगळी माहिती आपण त्यांना देतो आणि या ठकसेनांच्या जाळ्यात अडकतो. परंतु असे करु नका वेळीच सावध व्हा.
1. बँकेत किंवा कंपनीत तुमचे पैसे अडकले असतील, तर 15 दिवसांत मिळवून देतो असं सांगणारा एक फोन येतो
2. रिफंड मिळवून देण्यासाठी तुम्हाला एक लिंक येते आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितलं जातं.
3. लिंकवर क्लिक केल्यावर एक फॉर्म ओपन होतो. त्यात तुमचं नाव, मोबाईल नंबर, पेमेंटची पद्धत, यूपीआय, बँकेचा तपशील भरायला सांगितलं जातं.
आणि त्यानंतर तुमच्या बँकेतील पैसे काढून घेतले जातात.
या भामट्यांच्या या फ्रोड करण्याच्या पद्धतीमध्ये कुठेही ओटीपी मागितला जात नाही त्यामुळे आपण निश्चिंत असतो. परंतु ही फिशिंग लिंक असते. त्यात भरलेली माहिती थेट भामट्यांच्या हाती जाते आणि तुमचं बँक खातं क्षणात रिकामं होऊ शकतं.
त्यामुळे अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय.
1. आलेल्या वेबसाईटचा तपशील नीट तपासा.
2. त्याची युआरएल https पासुन सुरु होत असेल, तर ती साईट सुरक्षित मानायला हरकत नाही. कारण https पासून सुरु होणाऱ्या साईट्स सुरक्षित माणल्या जातात.
3.परंतु हे लक्षात घ्या की, नुसतं http असेल, तर त्या वेबसाईटवर जाणं टाळा. कारण त्यानावाने फेक वेबसाईट सुरु करता येऊ शकते त्यामुळे त्याचे मागचे पुढचे चिन्ह देखील नीट तपासा
4. बँक किंवा कंपनीच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, लोगोमध्ये तफावत नाहीये ना याची खातरजमा करून घ्या.
5. पॉप-अप विंडोमध्ये कधीही माहिती भरायला सांगितली जात नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे जर अशा ठिकाणी तुम्हाला माहिती भरायला सांगितली गेली, तर ती कधीही भरु नका.
आजच्या इंटरनेट च्या युगात आपण बहुतेक व्यवहार हे ऑन लाईन करतो ,याचाच फायदा ह्या सायबर गुन्हेगारी टोळ्या घेत आहेत, त्यामुळे आपण सतर्क आणि सावध राहून आपली बॅंक व्यवहाराची माहिती कोणाला देऊ नये आणि कोणतीही अनोळखी लिंक उघडू नये त्यामुळे आपण अशाप्रकारची फसवणूक टाळू शकतो.