टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल

गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा-मोहला बदलला आहे. अनेक आयटी कंपन्या पुण्यात उभ्या राहिल्या आहेत, नोकरीनिमित्ताने अनेक तरुण-तरुणी पुण्यात स्थायिक होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी पुण्याला टार्गेट केलं आहे. 

Updated: Apr 11, 2023, 05:37 PM IST
टेक्नोसॅव्ही पुणेकर गोड गप्पांना भुलले, चार महिन्यात फसवणूकीचा उच्चांक पाहून हैराण व्हाल title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणेकरांना (Pune) टेक्नोसॅव्ही (techno savvy) असं म्हंटलं जात असलं तरी याच टेक्नोसॅव्ही नागरिकांची स्मार्ट सायबर चोरटे (Cyber Crime) तितक्याच गोड गप्पा मारत फसवणूक करत असल्याचं दिसत आहे. गेल्या चार महिन्यात शहरातला आतापर्यंतचा फसवणूकीचा उच्चांक झाला आहे. सायबर गुन्ह्याच्या तब्बल पाचशेहून अधिकारी तक्रारी पोलिसांकडे (Pune Police) नोंदवल्या गेल्या आहेत. या फक्त पोलिसांकडे आलेल्या तक्रारी आहेत. पोलिसांपर्यंत न पोहचलेल्या गुन्ह्यांची संख्या वेगळीच आहे. या सायबर चोरट्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. 

राज्यासोबतच देश-विदेशातून हजारो नागरिक पुण्यात नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने वास्तव्याला आहेत. त्याचा फायदा सायबर चोरटे घेत असून, त्यांनी पुणेकरांना टार्गेटच केलं आहे. नागरिकांना विविध आमिषं दाखवून ऑनलाईन गंडा (Online Fraud) घालण्याचे प्रकार सुरू आहेत. यात विदेशातील गिफ्ट, नोकरी, महागड्या वस्तू, जादा परतावा, इन्शुरन्स पॉलिसी, डॉलर, पेटीएम किंवा बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने फसवणूक करीत आहेत आणि याला पुणेकरही भूलत आहेत. 

सामान्य नागरिकांना फसवण्यासाठी सायबर ठग विविध क्लुप्त्या लढवतात. आता फसवणुकीची नवी पद्धत त्यांनी अंमलात आणली आहे. पुण्यातील सायबर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पहिल्या गुन्हामध्ये तक्रारदाराचे तब्बल एक कोटी दहा लाख रुपये लंपास झाले. तर दुसऱ्या तक्रारीत 47 लाखांची फसवणूक झाली आहे. तिसऱ्या घटनेत 9 ते 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे

कशी होती फसवणूक
तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जातो. त्यात नोकरीसाठी एक टास्क दिला जातो, सुरवातीच्या 3 टास्क फ्री दिल्या जातात आणि आणखी काही टास्क देऊन त्यातून पैसे तुमच्या अकाऊंटला जमा होतात. प्रत्येक टास्कनंतर तुमच्या अकाऊंटला थोडे-थोडे पैसे वाढत जातात. पैसे मिळत असल्याने ग्राहकाचा विश्वास वाढत जातो. त्यानंतर एका मोठ्या रकमेचा टास्क दिला जातो, आणखी पैसे मिळण्याच्या हवास्याने ग्राहक तो टास्क पूर्ण करतोत, पण त्याच्या अकाऊंटला पैसे जमा होण्याऐवजी ग्राहकाच्याच अकाऊंटमधून मोठी रक्कम गायब केली जाते. 

पोलिसांनी केलं आवाहन
सायबर पोलिसांनी अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. असे कोणतेही मेसेज आले तर त्याकडे दुर्लक्ष करावं. आठ-नऊ तास नोकरी करून काही रुपयांत पगार मिळतो. मग एका मेसेजवर पगारापेक्षा दुप्पट पैसे कसे मिळतील हा विचार करावा असं पोलिसांनी सांगितलं आहे. अशी फसवणूक कोण करत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असं आवानही पुणे पोलिसांनी केलं आहे.