पुणे हादरलं! ब्रेकअपनंतर त्याने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवलं; समोर आलं खरं कारण

Pune Man Killed Girlfriend Mother: या तरुणीच्या वडिलांचं जानेवारीच्या पहिल्या तारखेला निधन झालं. यानंतर तिने नोकरी सोडली होती. सध्या घरी ही तरुणी आणि तिची आई अशा दोघीच राहत होत्या अशी माहिती तपासात समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 24, 2024, 08:22 AM IST
पुणे हादरलं! ब्रेकअपनंतर त्याने गर्ल्डफ्रेण्डच्या आईलाच संपवलं; समोर आलं खरं कारण title=
मृत महिला तिच्या मुलीबरोबर राहत होती (प्रातिनिधिक फोटो)

Pune Man Killed Girlfriend Mother: पुण्यामध्ये हत्येचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका प्रियकराने प्रेयसीबरोबर झालेल्या ब्रेकअपच्या रागातून असं काही केलं की ते वाचून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाल्याने संतापलेल्या या तरुणाने आपल्या प्रेयसीच्या आईचीच हत्या केली. आईचा विरोध असल्याने आपण ब्रेकअप करुयात असं म्हणत या तरुणीने प्रियकराबरोबर नातं संपुष्टात आणलं होतं. याच गोष्टीचा राग मनात ठेऊन प्रेयसीच्या आईमुळेच ब्रेकअप झाल्याचा सूड घेण्यासाठी प्रियकराने तिची हत्या केली. सदर घटना पुण्यातील पाषाण सुस मार्गावरील एका सोसायटीमध्ये घडली आहे. या ठिकाणी हत्या झालेली महिला तिच्या मुलीबरोबर राहत होती. जानेवारीच्या सुरुवातीलाच या मुलीच्या वडिलांचं निधन झालं होतं. या मुलीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

वडिलांचं निधन, नोकरी सोडली अन्...

'पुणे मिरर'ने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाषाण सुस रोड येथील माउंटवर्ट अल्टसी सोसायटीमध्ये वर्षा क्षीरसागर (58) या त्यांची 22 वर्षीय मुलगी मृण्मयी क्षीरसागरबरोबर राहत होत्या. त्यांची मुलगी कंप्युटर इंजीनियर आहे. वर्षा यांच्या पतीचं 1 जानेवारी रोजी निधन झालं. त्यांनंतर मृण्मयीने नोकरी सोडली. दरम्यान, दुसरीकडे 7 महिन्यांपूर्वी एका डेटींग अ‍ॅपवरुन ओळख झालेल्या शिवांशु दयाराम गुप्ता या 23 वर्षीय मुलाला ती डेट करत होती. दोघांची पहिल्यांदा प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर त्यांच्यातील गप्पा आणि मैत्री वाढत गेली आणि ते प्रेमात पडले. अनेक महिन्यांनंतर मृण्मयीला तिचा प्रियकर डिलेव्हरी बॉय म्हणून करतो असं समजलं. दुसरीकडे शिवांशुने आपल्याला इतर कोणतंही काम न मिळाल्याने आपण डिलेव्हरी बॉयचं काम करतोय असं प्रेयसीला सांगितलं.

आईने नात्याला का विरोध केला?

मृण्मयीची आई वर्षा यांचा या नात्याला विरोध होता. शिवांशुची नोकरी आणि आर्थिक स्थिती आपल्या तोलामोलाची नसल्याचं वर्षा यांचं म्हणणं होतं. शिवांशुबरोबर कोणतंही नातं ठेवण्याची गरज नसल्याचं वर्षा यांनी मुलीला स्पष्टपणे सांगितलं होतं. मृण्मयीने आपल्या आईचं म्हणणं ऐकत शिवांशुबरोबर ब्रेकअप केलं. मात्र यामुळे शिवांशु नाराज झाला.

नक्की त्या दिवशी घडलं काय?

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांशु एका रात्री अचानक मृण्मयीच्या घरात शिरला. त्याने आधी वर्षा यांनी मुलीला आपल्याबरोबर लग्न करण्यासाठी मान्यता द्यावी म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षा यांनी त्याचं काहीही ऐकून घेण्यास नकार दिला. संतापलेल्या शिवांशुने पट्ट्याने गळा आवळून वर्षा यांची हत्या केली. हा सारा प्रकार घडला तेव्हा मृण्मयी घरात उपस्थित होती की नाही याची माहिती मिळालेली नाही. वर्षा यांची हत्या केल्यानंतर शिवांशु घटनास्थळावरुन पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वर्षा यांचा मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमार्टमला पाठवण्यात आला.