महाराष्ट्रात काय चाललंय? भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मोर्चाची तयारी सुरु असतानाच RTI कार्यकर्त्याची हत्या

Sangli Crime News : सांगलीत माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष कदम असे आरटीआय (RTI) कार्यकर्त्याचे नाव असून त्यांच्याच गाडीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Updated: Feb 9, 2024, 12:21 PM IST
महाराष्ट्रात काय चाललंय? भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात मोर्चाची तयारी सुरु असतानाच RTI कार्यकर्त्याची हत्या title=

सरफराज मुसा सनदी, झी मीडिया, सांगली : सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या निर्घृण हत्येने सांगली हादरून गेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करुंदवाड येथे संतोष कदम यांच्या गाडीमध्येच त्यांचा मृतदेह आढळून आला होता. धारधार शस्त्रांनी हल्ला करून संतोष कदम यांची हत्या करण्यात आली आहे. मात्र ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणातून केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पण याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता अशी संतोष कदम (वय 36) यांची सांगली शहरात ओळख होती. शहरातील जुना हरिपूर रोडवरील गावभाग येथे संतोष कदम हे राहत होता. पत्नी दोन लहान मुलं असा त्यांचा परिवार होता. गुरुवारी त्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथे नांदणी रोडवर एका शेतालगत निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले. विशेष म्हणजे गुरुवारी संतोष कदम याने सांगली महापालिका कार्यालयावर भ्रष्ट अधिकाराऱ्यांविरोधात गाढव मोर्चाचे आयोजन केले होते. तत्पूर्वी कदम यांचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली.मोर्चा काढण्याबाबत अर्ज देण्यासाठी कदम हे बुधवारी शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यानंतर त्यांना मित्राचा फोन आल्याने, ते कोल्हापूर जिल्ह्यातील आलासकडे निघाले. कदम यांनी तशी कल्पना देखील पत्नीला दिली होती.

यानंतर कदम हे कोल्हापूरकडे निघून गेले. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा मोबाईल स्विच ऑफ लागत असल्याने पत्नीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत पती बेपत्ता असल्याची फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर तपास सुरू असताना त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले. 

संतोष कदम हे गेल्या काही वर्षांपासून माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत होते. सांगली महापालिका क्षेत्रातल्या वेगवेगळ्या विभागात माहिती अधिकारात त्यांनीअर्ज टाकून भ्रष्टाचार बाहेर काढले होते. अनेक भ्रष्टाचारांची चौकशी लावली होती. यातूनच त्यांच्या विरोधात अनेक विरोधक निर्माण झाले होते. त्याबरोबर सांगलीतील दोन माजी नगरसेवकांच्या विरोधात देखील संतोष कदम यांनी तक्रारी केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. यातून संतोष कदम याला मारहाण देखील झाली होती. तर संतोष कदम यांच्या विरोधात देखील शहर पोलीस ठाण्यामध्ये खंडणीच्या तक्रारी देखील होत्या. त्यामुळे संतोष कदम याचा खून कोणी व कोणत्या कारणातून केला? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, या खुनाचा तपास हा सांगली पोलिसांच्याकडे वर्ग करण्यात आला असून शहर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गतीने तपास करण्यात येत आहे. तर कदम यांना या पूर्वी सांगलीत मारहाण झाली होती. मात्र त्यावेळी ते बचावले होते. पण कुरुंडवाडी या ठिकाणी त्याला तातडीने कोणी बोलावलं? आणि हा पूर्वनियोजित कट आहे का? अशा चर्चेला उधाण आले आहे.