कोरोना : नाशकात दोघं देखरेखीखाली तर पुण्यात क्रीडा स्पर्धा स्थगित

दुबईतून नाशिकला परतलेल्या दोघांना देखरेखीखाली ठेवण्यात आलेय. तर पुण्यातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्यात.

Updated: Mar 11, 2020, 11:24 AM IST
कोरोना : नाशकात दोघं देखरेखीखाली तर पुण्यात क्रीडा स्पर्धा स्थगित title=

नाशिक/पुणे : दुबईतून नाशिकला परतलेल्या आणि सर्दी - फ्ल्यूने ग्रस्त असलेल्या तरुणीसह तिच्या आईला नाशिकमधल्या कोरोना वार्डमध्ये दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्या दोघींना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांचा वैद्यकीय अहवाल दुपारपर्यंत येणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत माहिती देण्याचं आवाहन नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. तर पुण्यातील क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, मुंबईतही सहा जणांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या पुण्यातील 'त्या' कुटुंबासोबत विमानातून प्रवास केलेल्या मुंबईतील सहा प्रवाशांचा शोध लागला आहे. मंगळवारी मुंबई महापालिकेने त्यांचा शोध घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या सर्वांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या सहा जणांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल बुधवारपर्यंत येणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे.

महापौर चषक क्रीडा स्पर्धा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापौर चषक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेला क्रीडा प्रेमी आणि नागरिकांची मोठी गर्दी होत असते त्यामुळे कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महापौरांनी ट्विट करून सांगितलंय. दिव्यांगाच्या राज्यस्तरीय स्पर्धा देखील कोरोनामुळे रद्द झाल्यायत. येत्या १४, १५ मार्च रोजी पुण्यातील बालेवाडी इथे या स्पर्धा होणार होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून आता या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात आदेश दिले आहे. तर दुसरीकडे पुण्यामध्ये कोरोनाच्या भीतीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नांदेड सिटीतील दोन शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या दोन शाळा तीन दिवस बंद राहणार आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरता हे पाऊल शाळा व्यवस्थापनानं उचलले आहे. 

0