Coronavirus : काय आहे राज्याचा रिकव्हरी रेट आणि सध्याची रुग्णसंख्या?

एका क्लिकवर जाणून घ्या राज्यातील कोरोनाची स्थिती

Updated: Oct 8, 2020, 08:59 PM IST
Coronavirus : काय आहे राज्याचा रिकव्हरी रेट आणि सध्याची रुग्णसंख्या?  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोनाव्हायरसचा coronavirus वाढता प्रादुर्भाव अनेकांच्या चिंतेत भर टाकत आहे. देशभरात दर दिवशी हजारोंच्या संख्येनं कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच राज्यातही चित्र वेगळं नाही. कोरोनामुळं सर्वाधिक प्रभावित असणाऱ्या राज्यांपैकी एक असणाऱ्या महाराष्ट्रात गुरुवारी १३,३९५ नवे कोरोनाबाधित आढळले. 

कोरोनामुळं या एका दिवसात ३५८ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, तब्बल १५,५७५ रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली. राज्यात एका दिवसातील कोरोना रुग्णांची ही आकडेवारी पाहता एकूण रुग्णांचा आकडा १४,९३,८८४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३९,४३० मृत्यू आहेत, तर ११,९६,४४१ रुग्णांनी कोरोनारवर मात केली आहे. 

सध्याच्या घडीला राज्यात २,४१,९८६ रुग्णांवर कोरोनासाठीचे उपचार सुरु आहेत. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे राज्यात कोरोनातून सावरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं भर पडत आहे. परिणामी राज्याचा रिकव्हरी रेट ८१.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

 

कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांनाही राज्य शासनाकडून कोरोना टेस्ट करण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शिवाय घरोघरी जाऊऩ रुग्णांचा शोध घेण्याची आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार पद्धत अवलंबण्याची जबाबदारी राज्यातील आरोग्य यंत्रणांनी घेतल्यामुळं कोरोना काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. येत्या काळात रिकव्हरी रेट वाढवून कोरोना मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणण्याकडेच प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचा भर असेल. यामध्ये नागरिकांची सतर्कता आणि सावधगिरी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.