मुंबई : राज्यातील Coronavirus कोरोना रुग्णांचा एकूण आकडा सध्या प्रशासनासह आरोग्य खात्यापुढे काही मोठी आव्हानं उभी करत आहेत. मंगळवारी एका दिवसात संपूर्ण राज्यात कोरोनाचे नवे १०२६ रुग्ण आढळून आले. तर, राज्यात ३३९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्णांनी या विषाणूवर मात केली. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयीची माहिती दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना चाचणीच निगेटिव्ह आले आहेत. तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ नागरिक होम क्वारंटाईनमध्ये असून, १५ हजार ६२७ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
आज राज्यात ५३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची एकूण संख्या आता ९२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील २८, पुण्यात ६, पनवेल मध्ये ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाल्याचीच बाब समोर येत आहे. आजच्या मृतांमध्ये २९ पुरुष तर २४ महिला आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी....
धारावी, माहीम आणि दादरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. आज याठिकाणी ६३ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. ही मुंबईकरांसाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. यात धारावीतील ४६, माहीममधील ६ आणि दादरमधील ११ नव्या रुग्णांचा समावेश आहे.