येव नको, कोकणात क्वारंटाईन करूक जागा नाया....

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात चाकरमान्यांनी येऊ नये, असं आवाहन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

Updated: May 17, 2020, 09:31 PM IST
येव नको, कोकणात क्वारंटाईन करूक जागा नाया.... title=

रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात चाकरमान्यांनी येऊ नये, असं आवाहन तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. या दोन्ही जिल्ह्यांची विलगीकरणाची क्षमता संपली आहे, त्यामुळे येणाऱ्या नव्या लोकांसाठी स्थानिक प्रशासनाकडे सुविधा नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांनी कोकणासाठी पासेस देऊ नयेत, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

मागच्या आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी मुंबई-पुण्यावरून कोकणात येताना पाहायला मिळत आहेत. चाकरमान्यांचे हे लोंढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर येत आहेत. जी क्षमता कोकणात तयार करण्यात आली होती, ती पूर्णपणे संपली आहे. मात्र लोंढे काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना पत्रव्यवहार केला आहे.

आता सध्या कोकणात येण्यासाठी पास देऊ नका. पुढचा टप्पा येईल तेव्हा आम्ही स्वत:हून आमची तयारी पूर्ण झाल्यावर सांगू, असं दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी या पत्रात सांगितलं आहे.

कोकणात येणाऱ्यांसाठी मुंबई-पुण्यावरून पास दिले जात आहेत. हे प्रवासी कोकणात आल्यानंतर त्यांना परत मुंबई-पुण्याला पाठवायचं कसं? हा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे त्यांना रत्नागिरी सिंधुदुर्गात प्रवेश दिला जात आहे. पण आता आरोग्य विभागावर येणारा ताण लक्षात घेता दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र पाठवलं आहे.