कोरोना उद्रेकामुळे आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर; राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत चौपट वाढ

वाढत्या रूग्णसंख्येसोबत ऑक्सिजनच्या मागणीतही चौपट वाढ झाली आहे

Updated: Apr 4, 2021, 10:05 AM IST
कोरोना उद्रेकामुळे आरोग्ययंत्रणा व्हेंटिलेटरवर; राज्यात ऑक्सिजनच्या मागणीत चौपट वाढ title=

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुस-या लाटेचा उद्रेक झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येसोबत ऑक्सिजनच्या मागणीतही चौपट वाढ झाली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. 

राज्यात दररोज सरासरी 40 हजार कोरोना रूग्णांची भर पडतेय. या वाढत्या रूग्णसंख्येनं एक नवी समस्या उभी केली आहे. ती म्हणजे ऑक्सिजनची. कोरोना रूग्णांना लागणा-या ऑक्सिजनच्या मागणीत चौपटीनं वाढ झाली आहे. 

राज्यात दररोज 1200 मेट्रीक टन ऑक्सिजन तयार होतो. त्यापैकी सामान्य परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी 150 ते 200 मेट्रीक टन ऑक्सिजन लागतो पण कोरोनाचे रुग्ण वाढल्यामुळे हीच मागणी दररोज 700 मेट्रीक टनांपर्यंत वाढलीय. गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाचे रुग्ण वाढले, त्यावेळी ही मागणी 600 मेट्रीक टनांपर्यंत गेली होती.

रूग्णवाढीची परिस्थिती अशीच राहिली तर राज्यात ऑक्सिजनची स्थिती गंभीर होऊ शकते. शिवाय हॉस्पिटलव्यतिरिक्त इतर उद्योगांनाही ऑक्सिजन लागत असल्यानं हे उद्योगही अडचणीत येऊ शकतात. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र राज्यात सध्याच्या घडीला पुरेसा ऑक्सिजनसाठा असल्याचं म्हंटलंय. 

आरोग्यमंत्र्यांनी पुरेशा ऑक्सिजनचा दावा केला असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. ऑक्सिजनसोबत रक्ताचा तुटवडाही जाणवू लागलाय. त्यामुळे आरोग्ययंत्रणांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. 

कोरोनाचा उद्रेक लक्षात घेता पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आणि रक्तसाठा याकडे लक्षं देणं आवश्यक आहेत. अन्यथा महाराष्ट्राचा ब्राझील होण्यास फारसा वेळ लागणार नाही.