मुंबई : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस पुन्हा वाढतच चाललाय. आज दिवसभरात तब्बल 8 हजार 807 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तकर तब्बल 80 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईतही कोरोना रुग्णांनी गेल्या कित्तेक दिवसांनंतर हजाराचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे मुंबईतही कोरोना वाढत चालल्याचं दिसतं आहे. मुंबईत आज तब्बल 1167 रूग्णांची नोंद झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती व्यक्त केली जातेय. जानेवारीच्या सुरूवातीला घसरणीला लागलेल्या कोरोनानं फेब्रुवारी मध्यापासून पुन्हा डोकं वर काढलं आहे. निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता हे कोरोनावाढीचं कारण मानलं जातंय. मात्र तरीही जगाच्या तुलनेत भारतात अजूनही कोरोनाचं प्रमाण कमीच आहे. 95 टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणंच आढळत आहेत.
नवी मुंबईत आज 130 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये गेल्या 24 तासात 215 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. ज्यामध्ये यवतमाळ शहरात सर्वाधिक 100 रुग्ण आहेत.
अमरावती जिल्ह्यात आज दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आज सकाळपासून 802 कोरोना बाधित रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 31925 रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
चंद्रपुरात गेल्या 24 तासात 34 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर अकोल्यात 385 रुग्ण वाढले आहेत. जालन्यात 111 रुग्णांची वाढ झाली आहे.
1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी म्हटलं आहे. 45 पेक्षा जास्त वय असलेल्या व्याधीग्रस्तांनाही प्राधान्य दिलं जाणार आहे. 10 हजार सरकारी आणि 20 हजार खाजगी केंद्रावर लस दिली जाणार आहे. सरकारी केंद्रावरची लस मोफत असणार आहे. खासगी रुग्णालयातही लस विकत घेता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.