मुंबई : सर्वसामान्यांच्या खिशाला आजपासून महागाईची झळ बसणार आहे. कारण नव्या आर्थिक वर्षात अनेक नवे बदल करण्यात आलेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर पडणार आहे. एकीकडे रोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असताना आजपासून औषधं आणि घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचं बजेट कोलमडणार आहे.
एकीकडे भारत 1 एप्रिल 2022 पासून मास्क मुक्त होत आहे. तब्बल दोन वर्षांनंतर मास्कमुक्ती होत आहे. तर दुसरीकडे 27 मार्चपासून चीनच्या शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. चीन सरकारने झिरो कोविड धोरण स्वीकारले आहे. ज्या अंतर्गत कोविडला देशातून पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण भारतापेक्षा जास्त आहेत.
आता मास्क न घातल्याने दंड केला जाणार नाही. वैयक्तिक कारमध्ये मास्क घालण्याची सक्ती संपली आहे. यासोबतच मुंबईने मास्क घालण्याची अटही रद्द केली आहे. यासोबतच पश्चिम बंगालनेही मास्क घालण्यावरील बंदी हटवली आहे. तथापि, प्रत्येक राज्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, दोन यार्डांचे अंतर राखणे आणि हात स्वच्छ करणे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. परंतु व्यापकपणे, कोणताही नियम अनिवार्य ठेवण्यात आलेला नाही. तसेच मुंबई रेल्वे प्रवासाठी दोन डोसची अट हटविण्यात आली आहे. मात्र, एम्सच्या अहवालानुसार, हात धुण्याची आणि लोकांशी हस्तांदोलन न करण्याची सवय कायम ठेवली, तर अनेक आजार टाळता येऊ शकतात.
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना विषाणूच्या संदर्भात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा 1 एप्रिलपासून संपत आहे. या अंतर्गत, कोरोनाची कॉलर-ट्यून संपली. म्हणजेच, जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करता तेव्हा तुम्हाला खोकल्याचा आवाज ऐकू येणार नाही आणि तो आवाज लसीकरणाचे महत्त्व सांगणारा आहे. आरोग्य मंत्रालयाने या सूचनांचे परिपत्रक सर्व दूरसंचार ऑपरेटरना पाठवले आहे.
राज्यात सीएनजी आजपासून स्वस्त झाला आहे. सीएनजीवरील व्हॅट 10.5 टक्क्यांनी कमी केल्याने सीएनजी किलोला सरासरी ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होणार आहे. सीएनजीवर 13.5 टक्के मूल्यवर्धित कर आकारण्यात येत होता. आता तो तीन टक्के आकारला जाणार आहे. मूल्यवर्धित करात कपात केल्याने सीएनजीचा दर किलोला 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घरगुती वीजग्राहकांना गोड बातमी मिळाली आहे. महावितरणचे वीजदर 2 टक्के तर टाटाचे वीज दार 4 टक्क्यांनी कमी होणार आहेत. तर बेस्टचे वीजदर स्थिर, अदानीच्या वीज दरात वाढ होणार आहे.
आजपासून औषधांच्या किंमती वाढणार आहेत.. पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांचा यात समावेश आहे. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे.
आजपासून रेडी रेकनरचे दर वाढलेत.. त्यामुळे घरांच्या किंमतीत वाढ होणार आहे. ग्रामीण भागात सरासरी 6.96% नगर पंचायत क्षेत्रात सरासरी 3.62% मुंबई वगळून महापालिका क्षेत्रात सरासरी 8.80% तर मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी 2.34% वाढ करण्यात आलीये.. 2020 नंतर पहिल्यांदाच ही वाढ करण्यात आलीये.
आधारशी पॅनकार्ड लिंक न केल्यास आता दंड भरावा लागणार आहे.. 30 जून 2022 पर्यंत 500 रुपये दंड आकारण्यात येईल.. त्यानंतर दंडाची रक्कम 1 हजार रुपये इतकी होईल.. 31 मार्च 2023 नंतर पॅन कार्ड आधारकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
आजपासून डिजिटल चलनावरही कर लागू करण्यात आलाय.. डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीवर 30 % कर आकारला जाणार आहे.. त्यामुळे एखाद्याला क्रिप्टो चलन विकून फायदा होत असेल तर त्याला कर भरावा लागणार आहे. 1 जुलैपासून विक्रीवरही 1%टीडीएस कापला जाणार आहे.