गोवा कोरोनावर मात करणारं देशातील पहिलं राज्य

गोवा कोरोना मुक्त झाल्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे

Updated: Apr 19, 2020, 07:51 PM IST
गोवा कोरोनावर मात करणारं देशातील पहिलं राज्य  title=

गोवा : अवघं जग सध्या कोरोना विरुद्ध दोन हात करण्यासाठी एकजूट झालं. जगात त्याचप्रमाणे भारतात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा महामारीच्या परिस्थितीत देशातील एक राज्य कोरोना मुक्त झाल्याची दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनामुक्त झालेल्या राज्याचे नाव गोवा आहे. गोवा कोरोना मुक्त झाल्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. गोवा कोराना मुक्त झाल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. रविवारी सर्व करोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर सर्व रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, 'गोव्यात शेवटाच्या कोरोना रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यामुळे हा क्षण समाधान आणि सुटकेचा आहे. या क्षणी डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफचं नक्कीच कौतुक करायला हवं. गोव्यात ३ एप्रिलनंतर कोणताही नवा करोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.' अशा  भावना त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

गोव्यात सात कोरोनाबाधित रूग्णांमध्ये सहा परदेशी नागरिक असल्याचं समोर आलं होतं. एक कोरोनाबाधिताला आपल्या परदेशातून आलेल्या भावामुळे कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. कोरोनाशी लढण्यासाठी गोवा सरकारने कोणती महत्वाची पाऊलं उचलली ज्यामुळे आज हे राज्य कोरोनामुक्त झालं आहे. 

भारतात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ३६५ वर पोहोचली आहे. त्यापैकी २ हजार ४६६ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली आहेत, तर ५२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.