वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?

Irshalwadi landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडीतल्या दरडग्रस्तांची वर्षभरापासून परवड सुरू आहे. जुलै महिन्यात इरसाल वाडीवर दरड कोसळून 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 23, 2024, 12:53 PM IST
वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच? title=
Containers turn homes for irshalwadi people nolight and water

प्रफुल्ल पवार, झी मीडिया 

Irshalwadi landslide: 19 जुलै 2023 रोजी रायगडमधील इरसाल वाडी या आदिवासी ठाकर वस्तीवर दरड कोसळून 84 जणांचा मृत्यू झाला होता. तर, या दुर्घटनेत जे बचावले त्यांचे चौकजवळ पुनर्वसन करण्यात आले. मात्र, आज वर्ष होत आले तरीही येथील ग्रामस्थाना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. एक हंडा पाण्यासाठी दूरवर जावे लागते आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यात कंटेनर तापल्याने प्रचंड उकाडा सहन करावा लागतो. उन्हाच्या दिवसांत यामध्ये राहणे अशक्य आहे, असं रहिवाशी सांगतात. 

इरसालवाडीतील 44 कुटुंबाचे कायम पुनर्वसन व्हावे यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलली. इरसाल वाडी पासून जवळच मानीवली इथ अडीच हेक्टर जागा संपादित करण्यात आली. सिडकोच्या माध्यमातून इथं घरे उभारण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. या कुटुंबांना पावसाळ्यापूर्वी नवीन घरे दिली जातील असं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं. सध्या हे काम 60 टक्क्यापर्यंत पूर्ण झालंय. प्रशासनाने या कामासाठी 10 जूनपर्यंत मुदत दिली आहे. तर 14 जूनपर्यंत ही कामे पूर्ण होतील असा दावा सिडकोचे अधिकारी करीत आहेत. परंतु घरे आणि नागरी सुविधा यांची सद्य स्थिती पाहिली तर दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता कमीच आहेय

घरांचे काम मजबूत आणि लवकरात लवकर व्हावे यासाठी प्री कास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. घरांचे वेगवेगळे भाग तयार केले जातात. ते जोडून घर तयार केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे कंटेनर शेडमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना वीज, पाणी टंचाई बरोबरच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. दरडीखाली जे जीव गेले त्याप्रमाणे सरकार आम्हाला देखील मारणार आहे काय? असा संतप्त सवाल दरडग्रस्त उपस्थित करीत आहेत. 

रात्रभर-दिवसभर लाइट जाते, उन्हाळ्यात लाइट गेल्याने उकाड्याने हैराण होतो. म्हणून कंटेनर सोडून बाहेर झाडाखाली वगैरे जाऊन बसतो, अशी माहिती दरडग्रस्तांनी दिली आहे. प्रशासनाने एक वर्षात पक्की व मजबूत घरे देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार घरांचे काम सुरू आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी दरडग्रस्तांना ही घरे मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसंच, घरे मिळाली नाहीत यंदाचा पावसाळाही त्यांनी कंटेनरमध्ये राहूनच काढावा लागणार आहे.