नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठिंबा दर्शवला. मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंचं कौतुक केल्यानंतर नागपूरच्या लोकप्रतिनिधींचा पारा आता चढला आहे. नुसतं ट्विट करणं आणि रिट्विट करणं, म्हणजे काम नाही, असा टोला नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी लगावला आहे. तर शिवसेनेचा मित्रपक्ष असलेली काँग्रेसही मुंढेच्या कौतुकामुळे नाराज झाली आहे.
तुकाराम मुंढे जे दाखवतात ते प्रत्यक्षात होतच नाही, असा आरोप काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे. ही वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देणार असल्याचं विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या कौतुकामुळे भाजप घायाळ झाली आहे, तर काँग्रेसचे नेतेही नाराज झाले आहेत.
तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणे अंमलात आणली, तर अशा अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहिलं पाहिजे, असं मुख्यमंत्री संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाले होते.
नाण्याची दुसरी बाजू आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू. लोकप्रतिनिधींचं कुठे चुकलं, जनतेचं कुठे चुकलं हे सगळं मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू, तेव्हा त्यांच्या पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.