Jitesh Antapurkar : नांदेड देगलूर काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहून पळ काढला. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वॉटिंग केल्याचा आरोप जितेश अंतापूरकर यांच्यावर आहे. तसेच चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये भाजप खासदार अशोक चव्हाणांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता अंतापूरकर यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाणांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. दोन दिवसांपूर्वीच अंतापूरकरांनी भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतली होती. त्यानंतर अंतारपूरकर भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा होतेय. दोघांची भेट घेण्याआधी अंतापुरकरांनी मतदारसंघातील भाजप पदाधिका-यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याची माहिती आहे. याशिवाय त्यांच्यावर विधानपरिषद निवडणूकीत क्रॉस व्होटिंग केल्याचा आरोप आहे. त्यामुळे लवकरच अंतापूरकर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्कतवली जात आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे तीन-चार आमदार फुटणार आहेत असा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला होता. हे आमदार कोण असतील ते सांगताना त्यांनी काही हिंट दिल्या होत्या. सुरुवातीला गोरंट्याल यांनी 'टोपीवाला' आमदार असा उल्लेख केला. सध्या विधानसभेत असलेले टोपीवाले आमदार म्हणजे राष्ट्रवादीचे झिरवळ, तसंच काँग्रेसचे शिरीष चौधरी आणि हिरामन खोसकर आहेत... या नावांचा विचार केल्यास हिरामन खोसकर यांचं नाव लगेच येतं. कारण त्यांनी अलिकडेच भुजबळांची भेट घेतली होती आणि ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या...
गोरंट्याल यांनी दुसरा उल्लेख केला तो 'आंध्र आणि नांदेड बॉर्डरवरचे आमदार'... आंध्र आणि नांदेडच्या बॉर्डरवर काँग्रेस आमदाराचा मतदारसंघ येतो तो म्हणजे देगलूर. या मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आमदार आहेत. जितेश अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे गोरंट्याल यांचा रोख अंतापूरकरांवरच असण्याची जास्त शक्यता वर्तवली जात होती.
गोरंट्याल यांच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा आमदार म्हणजे 'ज्यांचे वडील राष्ट्रवादीत आहेत'... लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्याकडे गोरंट्याल यांचा रोख दिसतोय. झिशान राष्ट्रवादीत जाणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जातंय... केवळ आमदारकी रद्द होऊ नये म्हणून ते काँग्रेसमध्ये असल्याचं बोललं जात होते.