Maharashtra Congress Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्वप्रथम 20 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. अशातच बुधवारी दिल्लीत काँग्रेसची कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातून काँग्रेसकडून 7 जागेचे उमेदवार निश्चित झाले आहेत, अशी माहिती झी 24 तासच्या सुत्रांनी दिली आहे. 'महाराष्ट्रातील 18-19 जागांवर चर्चा झाली आणि 12 जागा निश्चित झाल्या आहेत. उद्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची बैठक आहे. आमच्यात एक चर्चा बाकी आहे. ज्यात फायनल होईल आणि उद्या किंवा परवा आमच्या सर्व जागा जाहीर होतील', असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तर नाना पटोले यांना गोंदिया आणि विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूरमधून निवडणूक लढवण्याचे आदेश काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.
कोणती नावे निश्चित?
सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांचं नाव निश्चित मानलं जात होतं. अशातच आता प्रणिती शिंदे यांच्यावर नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर गडचिरोलीतून नामदेव उसेंडी यांच्या नावावर काँग्रेसने मोहर उमटवली आहे. त्याचबरोबर सर्वांना प्रतिक्षा असलेल्या कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराज यांना काँग्रेसने तिकीट दिलंय. तर अमरावतीत बळवंत वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यातून कोणाला संधी मिळणार? असा सवाल विचारला जात होता. मोहन जोशी यांना पत्ता कट करून काँग्रेसने रवींद्र धांगेकर यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदूरबारमधून के सी पाडवी यांच्या मुलाला तिकीट निश्चित झाल्याचं देखील समजतंय. तर प्रतिभा धानोरकर किंवा वड्डेटीवार यांपैकी एकाला चंद्रपूरमधून तिकीट मिळेल, अशी माहिती झी 24 तासच्या सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांना सोलापूरातून तिकीट कन्फर्म मानलं जातं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या पहिल्या यादीत घोषणा होणार आहे. तर पुण्यात रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळणार असल्याने मुरलीधर मोहोळ यांच्याविरुद्ध धंगेकर असा रंगतदार सामना पहायला मिळेल. पण वसंत मोरे आता कोणता निर्णय घेणार? असा सवाल देखील विचारला जात आहे. साताऱ्याच्या जागेवर शाहू महाराज यांना तिकीट मिळावं, अशी सर्वसमंती आधीच झाल्याने महाविकास आघाडीकडून शाहू महाराजांचं नाव लवकरच जाहीर होईल.