आरोग्य विभागाच्या परीक्षा आयोजनात पुन्हा गोंधळ

6200 पदांसाठी परीक्षा एकूण परीक्षार्थी सुमारे 8 लाख

Updated: Oct 16, 2021, 11:26 AM IST
आरोग्य विभागाच्या परीक्षा आयोजनात पुन्हा गोंधळ title=

मुंबई : आरोग्य विभागाच्या परीक्षेत न्यासा कंपनीने पुन्हा गोंधळ घातला आहे.  24 ऑक्टोबरला दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. पेपर दोन सत्रात आहेत. अशावेळी सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आली आहेत.

उमेदवारांनी निवडलेलं केंद्र न देता लांबची केंद्र दिली आहेत. काही उमेदवारांची एका पदाची परीक्षा देण्यासाठी 2 जिल्ह्यात नावे आली आहेत, तसंच वेळही एकच देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकणार आहेत. तसंच एका उमेदवाराला ३ परीक्षांसाठी ३ वेगवेगळ्या जिल्ह्य़ात हॉलतिकीट देण्यात आलं आहे. ५२ प्रकारच्या पदांसाठी आणि ६२०० पदांसाठी परीक्षा होत आहे. एकूण ८ लाख परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत. मात्र या सावळ्या गोंधळामुळे कित्येक परीक्षार्थींचं भवितव्य धोक्यात आलंय. 

असाच प्रकार या अगोदरही घडला आहे. राज्यातील आरोग्य सेवक पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा होणार होती. (Health Department Recruitment Exam) या परीक्षेच्या निमित्ताने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला. परीक्षेला बसलेल्या एका उमेदवाराला चक्क उत्तर प्रदेशात परीक्षा केंद्र दिले. त्यामुळे त्याला धक्का बसला. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाकडूनही परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या राज्यात परीक्षा केंद्र मिळाल्याने हा काय प्रकार, असा सवाल उपस्थित करण्यात आला. (Maharashtra  Health Department Recruitment Exam Admit Card)

आरोग्य सेवक पदाच्या भरती परीक्षेसाठी दत्ता पातूरकर हा उमेदवार बसला आहे. या परीक्षार्थीला चक्क उत्तर प्रदेशातील परीक्षा केंद्र देण्यात आले. त्याच्या प्रवेश पत्रावर नोएडा सेक्टर 55 असं छापून आले आहे. आरोग्य सेवक भरतीतील या गोंधळामुळे परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.