प्रशांत परदेशी, झी २४ तास, धुळे : राज्यात गेल्या काही दिवसांत थंडीचा कडाका वाढलाय. याचा विपरित परिणाम दूध उत्पादनावर होताना दिसतोय. थंडीचा थेट परिणाम गाई-म्हशींच्या मेंदूवर होतोय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
गेल्या आठड्याभरापासून राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. या थंडीनं शेतक-यांची चिंता वाढली आहे. कारण थंडीमुळे दूधाचं उत्पादनावर घटलं आहे. दुभत्या जनावरांच्या दूध देण्याच्या क्षमतेवर थंडीचा विपरीत परिणाम झाला असून दूध उत्पादनात सरासरी 15 ते 20 टक्क्यांपर्यंत घट झाली. गाई-म्हशींच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे त्यांचं दूध कमी झालं आहे.
राज्यात दररोज तीन कोटी लिटर दूध उत्पादन होतं. यातून 135 कोटींची उलाढाल होते. रोजच्या दूधसंकलनात 60 टक्के वाटा खासगी क्षेत्राचा आहे तर चाळीस टक्के दूध संकलन सहकारी संस्थांच्या माध्यमातून होतं. राज्यातील जवळपास 1 कोटी लोक दुग्धव्यवसायात आहेत.
दूध उत्पादनात घट झाल्यानं त्याचा मोठा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसतोय. त्यामुळे शेतक-यांनी जनावरांची काळजी घेणं आवश्यक आहे.
गाई-म्हशींची कशी काळजी घ्याल ?
थंडीपासून बचावासाठी जनावरांना बंदिस्त गोठ्यात ठेवा. त्यांना उबदार गवतावर बसवा. त्यांचं शरीर गरम राहावं यासाठी शाल पांघरा. तापमान 5 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असल्यास जनावरांची विशेष काळजी घ्या.
आधीच अवकाळीमुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यात आता थंडीचा फटका दूध उत्पादनाला बसतो आहे. थंडी अशीच वाढत राहिली तर शेतक-याचं आर्थिक गणित कोलमडून जाईल, शिवाय दुधाचे भावही वाढतील.