'मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत' पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे

'भाजपचे टिनपाट प्रवक्ते' मुख्यमंत्र्यांनी साधला भाजपवर निशाणा

Updated: Jun 8, 2022, 09:42 PM IST
'मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत' पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे title=

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळ बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. 

महाराष्ट्रात सर्व सुरळीत चाललं असताना भाजप कुणाला तरी सुपारी देतं, मग कोणाचा तरी भोंगामध्ये येतो, कोण तरी हनुमान चालिसाचा मुद्दा काढतं, कोणीतरी थडग्यावर डोकं टेकतं असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला.

रोज कुणाच्या तरी स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार, सरकार पडल्यानंतर मीच पुन्हा येणार असं ज्यांना वाटत होते, ते आता चिमटे काढून बघतायत, अडीच वर्ष झाली, ज्याला प्रशासनाचा अनुभव नव्हता,  असा माणूस मुख्यमंत्रीपदी बसला आहे, आणि महाराष्ट्राला पुढे नेणारी, अडीच वर्ष पूर्ण केली आहेत. 

ही वाटचाल नव्हती , केवळ तुमचं प्रेम आणि त्याही पेक्षा मोठा तुमचा विश्वास होता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत. गेली पंचवीस तीस वर्ष मित्र म्हणून ज्यांना आपण मांडीवर बसवलं होतं, तो आपल्या  उरावर नाचायला लागला आणि ज्याच्याबरोबर आपण भांडत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करण्याची संधी आणि साथ दिली आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

जो मित्र होता तो इतका हार्डवैरी झालेला आहे, आणि जे वैरी होते ते मित्र झाले आहेत. ज्या शिवसेनाप्रमुखांनी तुमच्या नेत्यांना वाचवलं आहे, ती शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली. सरकार पडत नाही म्हटल्यावर कोणाच्या मागे ईडी लाव, कोणाच्या मागे सीबीआय लाव, पण इकडे ईडी आणि सीबीआय लावण्यापेक्षा काश्मिरमध्ये जे पंडीतांना गोळ्या घातल्या जात आहेत तिकडे धाडी टाकून दाखवा, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

महाराष्टाचे मुख्यमंत्री म्हणून जे जे काश्मिर पंडितांसाठी करणं शक्य होईल ते आम्ही करु. भारत बंद करण्याची ताकद शिवसेनेशिवाय भाजपमध्ये नाही. शिवसेना बदनाम होऊ शकत नाही. आमच्या हिंदुत्वाची मोजमापं घेऊ नका, हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे गधाधारी नाही असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

'भाजपचे टिनपाट प्रवक्ते'
भाजपच्या एका प्रवक्त्याने प्रेषितांचा अपमान केला, काय संबंध आहे, आपल्या देवदेवतांचा अपमान कुणी करायचा नाही तसं त्यांच्याही देवदेवतांचा अपमान करण्याची तुम्हाला गरज नाही. पण त्या अपमानानंतर सर्व अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला माफी मागायला लावली. 

राजकीय मतभिन्नता असेल पण ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. आपल्या देशाचे पंतप्रधानांचे फोटो कचराकुंडीवर लावले जातात. देशाने का माफी मागायची, गुन्हा केला आहे तो भाजपने केला आहे. त्यांच्या टिनपाट प्रवक्त्यांनी केला आहे. भाजपाचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुनावलं.