Maratha Reservation : मनोज जरांगेंचा 'एल्गार', मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात...

CM Eknath Shinde On Manoj Jarange Patil : येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन झी 24 तासशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 23, 2023, 06:36 PM IST
Maratha Reservation : मनोज जरांगेंचा 'एल्गार', मुंबईत 20 जानेवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात... title=
Eknath Shinde On Maratha Reservation

Eknath Shinde On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी रान उठवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. अशातच आता सरकारकडून आश्वासक पाऊल न उचलल्याचा आरोप करत जरांगे पाटील यांनी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. येत्या 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाम मैदानावर जरांगे आमरण उपोषणासाठी बसणार आहेत. बीडमधील सभेत त्यांनी याची घोषणा केली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन झी 24 तासशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मनोज जरांगे यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने रिव्ह्यू पिटिशन स्विकार केली आहे. 24 तारखेला आम्ही कोर्टासमोर मराठा समाजाच्या सर्व मागण्या मांडू... सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना जी भूमिका मांडली होती. त्या सर्व तुटी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देताना इतर समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.  मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इंपिरिकल डेटा गोळा करण्य़ाचं काम आम्ही युद्धपातळीवर काम सुरू असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. सर्वांनी संयम राखावा, जरांगे पाटील यांना आव्हान आहे, की आपल्याला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणतात...

निष्पाप पोरांना अडकविण्याचे षडयंत्र सरकारने केलं. यांनी यांचेच हॉटेल जाळले अन निष्पाप मराठ्यांना मध्ये टाकले, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती, सरकार झोपू नका, मराठ्यांना राज्यात शांतता हवीय, त्यांना हुसकवू नका. ते कधीच जाळपोळ करू शकत नाहीत, असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी छगन भुजबळांवर देखील टीका केली. ते येवल्याच येडपड, त्याचाच सरकार ऐकतय, ते सोबत बाजाराची पिशवी घेऊन हिंडतंय, त्यात कागद, मग कशाला बोंबलतो रे मग, असं म्हणत जरांगेंनी आगपाखड केली.

तुला म्हटलं होतं नको नादी लावू, मी लई बेकार आहे. आता कसा बारीक आवाज बोलतो, जरांगे साहेब म्हणतो, आळी वळवळ करतो स्वत:ची, असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली. मी म्हणलं डंगराला कशाला बोलायचं, पण हे येडपट बोलते, मग आपण सोडत नसतो, जर कुणी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर त्याला सुट्टी नाही. शासनाला माझी विंनती आहे, येथे हजारो माता मावल्या लेकरांना घेऊन उन्हात बसल्यात,आमची एकच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण.. सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी, भुजबळच ऐकू नका, प्रत्येक राज्यातील मोठी जात असलेला समुदाय संपविण्याचा तुम्ही घाट घातलाय, पण सगळ्यांनी ठरवलं तर तुमचा सुपडा साफ होईल, असंही जरांगे म्हणाले आहेत.

तुम्ही आता पुन्हा वेगळा प्रयत्न करू नका, एकदा तुम्ही प्रयत्न केलात,त्याचे परिणाम तुम्ही बघितलेत. मी मॅनेज होत नाही, हा सरकारचा प्रॉब्लेम आहे, आरक्षण मिळविण्याची एवढीच संधी, संधीच सोन करा. आपल्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात. मला हे दुश्मन समजतायेत. सरकार मराठ्यांची फसवणूक करतंय. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय आता सुट्टी नाही द्यायची, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला आहे.

जे आपल्या लेकरांच्या सोबत तोच आपला. आपलं मत घेण्यापुरता जर दारात आला तर चपलानं हाना, किती दिवस आमचं रक्त पिणार आमचे मुडदे पडतांना तुम्हाला लाजा वाटत नाहीत, तुम्हाला मराठा जात संपवायची, पण मराठा जात संपणार नाही, असं जरांगे यांनी कडाडून सांगितलं. त्यांनी डाव टाकण्याचा प्रयत्न केला, तिकडं नोटिसा दिल्यात, नोटिसा दिल्यावर ते लोक म्हणतायेत, मी आधात मधात नसतांना मला नोटीस दिली मग मी समद्यात पुढे होतो, याचा परिणाम असा झाला. आंदोलन करायचं पण शांततेने, पण मराठा आरक्षण भेटल्याशिवाय पुन्हा हटायचे नाही. तुम्ही किती वेळ माघणार आणि आम्ही किती दिवस वेळ देणार? असा सवाल देखील त्यांनी केला.

पुढच्या आंदोलनाची दिशा आपण ठरवायची का? तुम्हाला विचारल्या शिवाय मी काही करीत नाहीत, गाफील वागायचं नाही, फक्त डाव टाकल्याने आपण यशस्वी झालो, त्यामुळे समदा इचार करायचा. त्यांनी आपल्याला नोटिसा दिल्या, मुंबईत कलम144 लागू केला, मग चला 20 जानेवारीला मराठे मुंबईत येणार, असं म्हणत मुंबई आंदोलनाची तारीख 20 जानेवारी ठरली आहे.