कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी : शिवसेनतून (Shivsena)केलेल्या बंडानंतर थेट मुख्यमंत्री पदी पोहोचलेल्या एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांची सध्या राज्यभरात चांगलीच चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी रिक्षा चालवत (Auto Rickshaw) होते. यामुळेच बंडखोरीनंतर त्यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह अनेकांनी त्यांचा उल्लेख रिक्षावाला करत टीका केली होती.
मात्र यानंतर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर म्हणून रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी योजना आणणार असल्याची माहिती समोर आली होती. एकनाथ शिंदे यांनीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रिक्षा मर्सिडीसपेक्षा पुढे गेली असा टोला लगावला होता.
त्यामुळे राज्यभरात रिक्षा चालकांची चर्चा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने एक फोटो व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या तरुणपणातील हा फोटो असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.
पण प्रत्यक्षात तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचं पुढे आलंय. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट बाबा कांबळे यांनाच फोन करत या बाबत माहिती विचारली. तेव्हा बाबा कांबळे यांनी हा फोटो आपलाच असल्याची माहिती अजित पवारांना दिली.
बाबा कांबळे यांनी पिंपरी मध्ये रात राणी रिक्षा सेवा सुरू केल्यानंतर सजवलेल्या रिक्षा समोर 1997 साली त्यांनी हा फोटो काढला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बाबा कांबळे यांच्या फोटोमध्ये साधर्म्य असल्याने तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दुर्मिळ फोटो असे म्हटल्याने अनेकांनी त्यावर विश्वास ठेवला आहे.
मात्र प्रत्यक्षात तो बाबा कांबळे यांचा असल्याचे समोर आल्याने गैरसमज दूर झालेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना ही कुतूहल निर्माण झाल्याने त्यांनी बाबा यांनाच केलेल्या फोनची चांगलीच चर्चा आहे. तसेच अजित पवार आणि बाबा कांबळे यांच्या संभाषणाची ही क्लिप ही चांगलीच व्हायरल होत आहे.