भुसावळ: भूखंड गैरव्यवहारातील आरोपांमुळे भाजपमधून बाजूला सारले गेलेल्या एकनाथ खडसे यांच्या भावी राजकीय वाटचालीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. ते शनिवारी भुसावळ येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना आगामी निवडणुकीत युतीची सत्ता आली तर खडसेंना मंत्रिमंडळात घेणार का, असा सवाल विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, नाथाभाऊ पक्षातील जेष्ठ नेते आहेत. त्यांना केंद्रात ठेवायचे की मंत्रिमंडळात ठेवायचे याचा निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे आता खडसेंना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्री खडसेंसोबत पुन्हा काम करण्यासाठी फारसे उत्सुक नसल्याचेही दिसून आले. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे-येवलेकर यांना विधानसभेचे तिकीट देण्यात येईल.
तसेच मी थोडाच काळ महाराष्ट्रात असून नंतर केंद्रात जाईल, या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी फडणवीस यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांचीही प्रशंसा केली. निर्मला सितारामन यांच्या निर्णयामुळे वाहन उद्योगात पुन्हा तेजी येईल. तसेच ग्राहकोपयोगी क्षेत्रातही मागणी वाढून विकासाला चालना मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.