विनाशस्त्र चहा पिण्यासाठी गेले अन्... अंदाधुंद गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू

Crime News : निशस्त्र असलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. दोघांचाही या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला. यानंतर नक्षलवाद्यांनी तिथून पळ काढला  

Updated: Feb 20, 2023, 02:00 PM IST
विनाशस्त्र चहा पिण्यासाठी गेले अन्... अंदाधुंद गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू title=

प्रविण तांडेकर, गोदिंया, झी मीडिया : राज्याच्या सीमाभागात अद्यापही नक्षलवादी (Naxalites) सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. सरकाराने नक्षली चळवळ संपत असल्याचे सांगितले तरी काही प्रमाणात नक्षलवादी अद्याप सक्रिय आहेत. सोमवारी सकाळी 10 ते 12 नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकी परिसरात दोन पोलिसांची हत्या केली आहे.

सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास 10-12  महिला आणि पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र असलेल्या दोन पोलिसांवर हल्ला करत त्यांची हत्या केली. दोघेही चहा पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात शोध सुरु केला आहे.

पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरु

सोमवारी बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह व ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरता पोलीस चौकीपासून मुख्य राज्यमार्गावर असलेल्या ढाब्याकडे गेले होते. मात्र आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी दोघांवर बेछूट गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर नक्षल्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पळ काढला. या घटनेनंतर गोंदिया पोलीस व छत्तीसगड पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.