अमर काणे, झी मीडिया, नागपूर : जगण्यातील संघर्ष हा प्रत्येक सजीवासाठी आहे. मग तो प्राण्यांना कसा चुकेल. जंगलातही आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अगदी किड्या मुंगीपासून ते वाघांपर्यंत सारेच संघर्ष करत असतात. असाच एक संघर्षाचा थरारक अनुभव वन्यजीव अभ्यासक आणि फोटोग्राफर विश्वास उगले यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. (Chota Mogali Tiger and Rangava Fight at Tadoba : See Pics ) हा अनुभव त्यांनी झी 24 तास आणि 24 तास डॉट कॉमसोबत शेअर केलाय.
निमढेला सफारी गेट, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात घडलेला हा थरार. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत हे सारं घडलं. पण विश्वास उगले यांच्या कॅमेऱ्याने तो थरार आपल्यात कैद केला.
ऑगस्ट महिन्यात 1 तारखेची गोष्ट. जवळपास सायंकाळी 4.30 चा अनुभव. विश्वास उगले आणि त्यांचे सहकारी निसर्गपर्यटनासाठी ताडोबाच्या निमढेला गेटमधून प्रवेश करून गेले. साधारण या भागात जेथे व्याघ्रदर्शन होते तेथे फेरफटका मारूनही वाघ काही दिसला नाही.
पावसाळी हवमान असल्यामुळे पावसाची मध्येच एक सर येऊन जात होती. 4 ते 5 किमी अंतरावर काही जिप्सी उभ्या दिसल्या. जिप्सी चालक इंद्रजित हनवतेने जिप्सी तेथे वळवली असून बाजूच्या झुडपात वाघ असल्याच इतर पर्यटकांवी सांगितलं.
वाघ साधारण 1 ते 2 मिनिटं तसाच उभा राहिला. तितक्याच समोरच्या वाटेवर एक रानगवा दिसला. रानगव्याने वाघाला पाहताच घाबरून जोरात आवाज केला. आणि त्यानंतर ते एकाच दिशेने पळू लागले.
डोळ्याची पापणी लवते न लवते तोच वाघ रानगव्याच्या कळपावर तुटून पडला. हा वाघ झरणी वाघीण आणि मोगली वाघ यांचा साधारण 2 वर्षांचा बछडा आहे. 'छोटा मोगली' असं या वाघाचं नाव.
फोटो पाहताना असं वाटतं की, रानगवा वाघावर हल्ला करत आहे. मात्र जगण्याच्या संघर्षाकरता रानगव्याने मोगली वाघाचा हल्ला उलटवून लावण्याचा प्रयत्न करत आहे. जंगलातही प्राण्यांचा आपल्या जगण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. हाच संघर्ष या फोटोत टिपण्यात आलाय.