मुंबई : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे निकष काय असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यंदा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे. निम्म्या विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाल्याने नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्यांनी वाढली.
13 लाख 14 हजार 935 नियमित विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांच्या उंबऱ्यावर प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले असून, 63 हजार 63 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर साधारण 26 हजार 300 खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
प्रवेशाची स्थिती
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 90 टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांच्या अटीतटीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे.
पदवी कॉलेजमध्ये तुकडय़ा वाढविण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा विचार आहे. तसेच इंजिनीयरिंग, वैद्यकीय, कृषी, विधी या अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या आधारे होतील. मात्र वाणिज्य शाखेच्या आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नेमके कसे होणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाहीत. आर्टस् शाखेचा निकाल यंदा तब्बल 17 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे बहुतांश सीनियर कॉलेजांमध्ये एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर जागा उपलब्ध होतील का, हादेखील प्रश्न आहे.
90 टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने महाविद्यालयांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्येही जवळपास 5 ते 10 टक्क्य़ांची वाढ होऊ शकेल, असे मुंबईतील एका महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.
शाखानिहाय निकाल
विज्ञान – 99.45%
कला – 99.83%
वाणिज्य – 99.91%
व्यवसाय अभ्यासक्रम – 98.80%
वाणिज्य, कला विद्यार्थ्यांपुढे मोठे आव्हान
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असते. त्यामुळे या शाखेतील काही जागा महाविद्यालयांमध्ये रिक्त होतात. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी हे पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. यंदा बहुतेक सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
नामवंत महाविद्यालयांमध्ये त्यांच्याकडील बारावीच्या विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्रवेश कायम केल्यास विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेश मिळणे यंदा कठीण होणार असल्याचे दिसते. कला शाखेचे सर्व विषय सर्व महाविद्यालयांमध्ये नसतात. त्यामुळे हवा तो विषय असलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवणेही विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.आमच्याकडील बारावीचे बहुतेक विद्यार्थी पदवीसाठी प्रवेश निश्चित करतात. त्यामुळे यंदा अगदी मोजके च प्रवेश महाविद्यालयांमध्ये उपलब्ध होऊ शकतील, असे मुंबईतील एका नामवंत महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.
प्रवेश परीक्षा अशक्य?
अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीही अकरावीप्रमाणेच सामाईक प्रवेश परीक्षा घेण्याची चर्चा विद्यापीठांमध्ये सुरू होती. मात्र, अद्यापही त्याबाबत काहीच ठोस निर्णय झालेला नाही. आता प्रवेश परीक्षा घ्यायची झाल्यास त्याची प्रक्रिया कधी राबवणार आणि परीक्षा घेऊन प्रवेश कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही परीक्षा होण्याची शक्यता नसल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.