भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे कुटुंबीय 'मातोश्री'वर

पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली

Updated: May 3, 2018, 07:44 PM IST

मुंबई : चिंतामण वनगांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकी संदर्भात आपल्या कुटुंबीयांनी भाजपनं आपल्यावर 'मातोश्री' गाठण्याची वेळ आणल्याचं म्हटलंय. वनगा कुटुंबीयांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भाजप आणि चिंतामण वनगा यांचं नातं अतूट होतं... परंतु, आज त्यांच्या कुटुंबीयांनी अश्रुभरल्या डोळ्यांनी आपल्या पक्षानं आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचं सांगितलंय. 

पालघर पोटनिवडणुकीत भाजपनं वनगा यांच्या कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची फोनवरून आणि एसएमएसवरून भेट मागितली पण त्यांनी काही वेळ दिली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. 

वनगा कुटुंबीय शिवसेनेत जाणार?

चिंतामण वनगांच्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. परंतु, भाजपनं वनगा कुटुंबीयांकडे दुर्लक्ष केल्यानं आपण भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकण्याच्या विचारात आहोत, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आता, वनगा कुटुंबीय शिवसेनेत जाणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

आमच्या घराच्या दारावर आजही बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांचं पोस्टर आपल्या दारावर असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.  

चिंतामण वनगा आणि भाजप

भाजपचे पालघर मतदारसंघाचे खासदार अॅड. चिंतामण वनगा यांचं जानेवारी महिन्यात दिल्लीत निधन झालं. मृत्यूसमयी ते ६७ वर्षाचे होते. वनगा यांच्या छातीत दुखु लागल्यानं त्यांना दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं... पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

वनगांनी आयुष्यभर आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी काम केलं. आदिवासी परिसरात भाजपचे मतदार वाढवण्यात वनगांचा मोठा वाटा होता. विविध प्रकल्प तडीला नेण्यात वनगांची मोठी भूमिका बजावलीय. विरार डहाणू लोकल सेवा सुरू करण्यासाठी वनगांनी खूप प्रयत्न केले. डहाणू-नाशिक रेल्वे मार्गासाठीही ते पाठपुरावा करत होते. ठाणे जिल्हाच्या विभाजनाच्या आंदोलनातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९६, १९९९ आणि २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली तर २००९ मध्ये विक्रमगडमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवून आमदारकी मिळवली होती.