जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : निसर्गाचं संवर्धन करायचं असेल तर पारंपरिक ऊर्जा स्रोतांशिवाय अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. याच विचारातून राज्यसरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून शेतकऱ्यांना पुरेशी वीज उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात आणि त्यांच्या सोयीनुसार दिवसा वीजपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी २०१७ साली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आली. शासकीय जमीन किंवा शेतकऱ्यांची पडीक असलेल्या जमिनीवर हे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची हि योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ १ रुपये ६० पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वर्धा जिल्ह्यात ५ ठिकाणी तर नागपूर जिल्ह्यात २ ठिकाणी हे सौर ऊर्जा प्रकल्प सुरु झाल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यापैकी नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्प हा 'महावितरण' तर्फे कार्यान्वयीत केलेला राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी नागपूरच्या सावनेर तालुक्यातील खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांना माफक दरात पुरेशी वीज उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यातूनच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु करण्यात आल्याची माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली. २०२० पर्यंत या योजनेच्या माध्यमातून राज्यातील १० लाख व येत्या पाच वर्षात ४२ लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेकडे स्थानांतरित करण्याचा प्रयत्न असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत महावितरण तर्फे राज्यातील २० जिल्ह्यात सुमारे २१८ तालुक्यात २ मेगावॅट ते १० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत करण्यात येणार आहेत. राज्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना आगामी काळात सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. नागपूरच्या सावनेर येथील खापा सौर ऊर्जा प्रकल्प ३ एकर जागेवर उभारला असून याची क्षमता ९०० किलोवॅट एवढी आहे. या प्रकल्पातून सुमारे ३५० शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होत आहे. वर्षातील पावसाळ्याचे २ महिने सोडले तर ३२८ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. आगामी काळ सौर ऊर्जेचा काळ असून सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. सौर ऊर्जेचा वापर केल्यास पर्यावरणाच्या रक्षणासह दिवसेंदिवस वाढणारे विजेचे दर कमी राखण्यासही मदत होईल.