Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात सतत बदल होताना दिसतोय. यावेळी अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणतोय. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्याच काही भागांमध्ये पावसाळी वातावरणाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग आणि तामिळनाडूपासून विदर्भाच्या काही भागापर्यंत कमी दाबाचा विरळ पट्टा तयार होत असल्यामुळं विदर्भावर पावसाळी ढग तयार होताना दिसतोय. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर तसंच यवतमाळ जिल्ह्यांत 18 मार्चपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याशिवाय उत्तर भारतात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील 32 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना घाबरुन न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. या ठिकाणी वातावरण कोरडेच राहणार आहे.
दिल्लीमध्ये आजपासून उष्मा आणखी वाढण्याची शक्यता असून पारा 30 अंशांच्या पुढे जाईल, असं हवामान खात्याने सांगितलंय. ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते. त्याचप्रमाणे किमान तापमानातही वाढ होणार असून 21 मार्चपर्यंत कमाल तापमान हळूहळू 32 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल.