फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर! अफजलखानच्या मृत्यूचा तपशील, संभाजी महाराजांचाही उल्लेख

Chatrapati Shivaji Maharaj Bakhar Found In France: एका पुणेकराने आणि कोल्हापूरकराने छत्रपती शिवाजी महाराजांची ही अप्रकाशित बखर शोधून काढली आहे. या बखरीमध्ये अनेक उल्लेख आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 14, 2024, 09:36 AM IST
फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर! अफजलखानच्या मृत्यूचा तपशील, संभाजी महाराजांचाही उल्लेख title=
फ्रान्समध्ये दोन मराठी संशोधकांना सापडली ही बखर

Chatrapati Shivaji Maharaj Bakhar Found In France: फ्रान्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची बखर सापडली आहे. पुण्यातील संसोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. 'नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स'मध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रे तसेच पुस्तकं चाळत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे.

मोडी लिपीत बखर

फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर मोडी लिपीत आहे. हस्तलिखित स्वरूपात असलेली ही बखर 1740 नंतर लिहिलेली आहे. छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकीर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीत नमूद करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे मारले? त्यावेळी कोण कोण लोक हजर होते? याचा तपशीलही या बखरीत आहे.

कशी सापडली ही बखर?

इतिहास संशोधक गुरुप्रसाद हे मूळचे कोल्हापुराचे आहेत. ते कोल्हापूरमधील शुक्रवार पेठेत राहायचे मात्र नोकरीनिमित्त मागील काही वर्षांपासून ते पुण्यात वास्तव्यास आहेत. तर मनोज हे मूळचे पुण्यातील असून ते सध्या नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतात. या दोघांनाही इतिहास संशोधन लेखनाची प्रचंड आवड आहे. हे दोघेही जवळपास 6 महिन्यांपूर्वी फ्रान्समधील बीएनएफ येथील हस्तलिखित स्वरुपातील जुनी कागदपत्रे पाहत होते. त्यावेळी या दोघांना मोडी लिपीतील काही कागदपत्रं दिसून आली. त्यांचा अभ्यास करत असताना त्यांना छत्रपती शिवरायांची ही जुनी अप्रकाशित बखर असल्याचं लक्षात आलं.

(मनोज दाणी आणि गुरुप्रसाद कानिटकर)

नेमकी कधीची आहे ही बखर?

फ्रान्समध्ये सापडलेली ही बखर चिमाजी आप्पांच्या सिद्धीवरील स्वारीनंतर म्हणजेच अंदाजे 1740 नंतर लिहिली गेली असावी असा अंदाज आहे. बखरीच्या शेवटी ही किताबत 'राजश्री राघो मुकुंद' यांची असे असा उल्लेख आहे. त्यामुळे ही बखर आतापर्यंत मिळालेल्या सर्व 91 कलमी बखरीचा पूर्वसुरी दस्तऐवज आहे असा दावा इतिहास संशोधकांनी केला आहे.

सापडलेल्या बकरीत नेमका कशाचा उल्लेख आहे?

- छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द

- छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीचा प्रारंभ

- छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाईसाहेब यांच्यातील संवाद.

- बोरीची काठी शिवाजी महाराजांच्या पालखीला कशी आडकाटी करत होते आणि तिथे खांद्यावर कसा द्रव्य लाभ झाला

- अफजलखानाला कसे मारले त्यावेळी कोण कोण लोक हजर होते

- छत्रपती संभाजी महाराज रायगडला आल्यानंतर त्यांनी तिथे असणारे सामान कशाप्रकारे ताब्यात घेतले

- विविध साधुसंतांच्या महाराजांनी घेतलेल्या भेटींचा संदर्भ