जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : भटकळविरोधात आरोप निश्चित

पोलिसांनी २०१३ साली यासिन भटकळला भारत-नेपाळच्या सीमेवर अटक केली होती

Updated: Apr 30, 2019, 10:38 AM IST
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट : भटकळविरोधात आरोप निश्चित  title=

पुणे : पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी तसंच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासिन भटकळविरोधात सोमवारी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोप निश्चितीसाठी भटकळला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी दिले होते. त्यानुसार त्याला कडेकोट बंदोबस्तात पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आलं.  

भटकळवर देशभरातील विविध दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी गुन्हे दाखल असून ठिकठिकाणच्या न्यायालयांत त्यासंदर्भातील खटले सुरू आहेत. तो सध्या तिहार जेलमध्ये आहे. जर्मन बेकरी खटल्याचं दोषारापपत्र २०१४ मध्येच दाखल झालंय मात्र सुनावणी सुरू झाली नव्हती. जर्मन बेकरी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. 

फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात झालेल्या कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जण ठार झाले होते तर जवळपास ६४ जण गंभीर जखमी झाले होते. सरकारी वकील उज्ज्वल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटकळविरोधात आयपीसीच्या स्फोटकं अधिनियम आणि बेकायदेशीर कृत्यं अधिनियमाच्या वेगवेगळ्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आलेत.  

याआधी, २०१३ च्या हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयानं भटकळला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलीय. पोलिसांनी २०१३ साली यासिन भटकळला भारत-नेपाळच्या सीमेवर अटक केली होती.