आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : वरोरा-वणी मार्गावर झालेल्या कारच्या भीषण अपघातात (Accident) प्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्याचा दुर्देवी मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynecologist) डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की डॉ. अश्विनी गौरकार आणि डॉ. अतुल गौरकार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने डॉक्टर दाम्पत्याला वरोरा ग्रामीण रुग्णालयात (Varora Rural Hospital) नेण्यात आलं, पण त्याधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मारेगाव इथल्या निवासस्थान आपल्या लहानग्याला ठेवून हे दाम्पत्य कामानिमित्ताने नागपूरला गेलं होतं. नागपूरहून परतताना काळाने त्यांच्यावर झडप टाकली. त्यांचा तो प्रवास अखेरचा ठरला. आपले आई-वडिल परत कधीच येणार नाहीत याची कल्पना त्या चिमुरड्याला नव्हती. चंद्रपूर जिल्ह्यातल्या नव्या वरोरा-वणी मार्गावर शेंबळ गावावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ज्या ठिकाणी अपघात झाला तो नवा महामार्ग NH 930 म्हणून ओळखला जातो. मारेगाव इथल्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी गौरकार आणि त्यांचे पती डॉ. अतुल वणी-मारेगावच्या दिशेने जात होते. त्याचवेळी शेंबळ गावाजवळ समोरून येणाऱ्या मालवाहू गाडीने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की कार अक्षरश: फरफटत गेली. अपघातावेळी डॉ. अश्विनी कार चालवत होत्या.
डॉ. अश्विनी या मूळ चंद्रपूर इथल्या रहिवासी असून मारेगाव शहरात प्रॅक्टिस करत होत्या. नुकत्याच त्या वणी इथल्या ग्रामीण रुग्णालयात देखील रुजू झाल्या होत्या. तर पती डॉ. अतुल वर्धा जिल्ह्यातील आर्वी इथं सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. अश्विनी यांनी अगदी थोड्या दिवसांपूर्वी वाहन परवाना प्राप्त केला होता. महामार्गावरच्या शेंबळ गावाजवळ अपघात झाल्यावर स्थानिक नागरीकांनी दोघांनाही वरोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र तोवर उशीर झाला होता. हे दाम्पत्य लहानगा मुलगा मारेगाव इथं आईवडिलांकडे ठेऊन कामानिमित्त नागपुरात गेले होते. परत येताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. वरोरा पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.