सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : निवडणुका आल्या की नेतेमंडळी आश्वासनांचा पाऊस पाडतात. पण देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनोखी ऑफर दिली आहे. भाजपला 70% पेक्षा जास्त मतदान देणाऱ्या गावांना गावजेवन देण्याची ऑफर चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
पोटनिवडणूकीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही अनोखी ऑफर दिलीय. विशेष म्हणजे या गाव जेवणात स्वतः आपण सहभागी होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलंय. चंद्रकांत पाटील यांच्या या ऑफरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टोला लगावला आहे. जेवण एक दिवस देणार आहेत की उर्वरीत तीन वर्षे असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित. तसंच यांच्या हातात काहीच नसल्याने अश्याप्रकाराची आश्वासने ते देत असल्याचं चव्हाण म्हणाले.
याआधी सांगलीत चंद्रकांत पाटील यांनी असंच वक्तव्य केलं होतं. राजकारणात आपल्याला कोण धक्का देणार नाही, असं सांगलीतल्या एका मोठ्या नेत्याला वाटत होते, येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना शॉक देणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्याला मी सोन्याचा मुकुट देणार आहे,' अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.