चंद्रशेखर भुयार, प्रतिनिधी, झी मीडिया, अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील चामटोली गावात लघु पाठबंधारे विभाग तर्फे बांधण्यात आलेल्या काँक्रीट बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आलंय. त्यामुळे अवघ्या एक वर्षा पूर्वी बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु आहे.
लघु पाटबंधारे विभागातर्फे चामटोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील चिंचोली गावातील नाल्यावर १० लाख रुपये खर्चून काँक्रीट बंधारा बांधण्यात आला होता. २०१४ -१५ साली या बंधाऱ्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मात्र प्रत्यक्षात २०१६ साली या बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले.
या बंधाऱ्यामुळे ४ हेकटर क्षेत्र सिंचना खाली येईल हा या मागचा उद्देश होता. मात्र या उद्देशालाच हडताळ फासला गेला आहे, कारण या बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून एक वर्षात बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरु झाली आहे.
या बंधाऱ्याची निविदा ही कॉक्रीट बंधारा अशी असतांना प्रत्यक्षात मात्र या बंधाऱ्याच्या कामात काँक्रीटचा वापर न करता दगड सिमेंटचा वापर केला आहे . त्यामुळे या बंधाऱ्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामा बाबाबत वारंवार तक्रारी करूनही ठेकेदारावर पाठीशी घातले जात असल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे.
या बंधाऱ्याच्या अडणाऱ्या पाण्यामुळे अनेक शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेतात अश्याच काही शेतकऱ्यांनी स्वत:च या बंधाऱ्याचं वाहून जाणारे पाणी अडवले आहे . त्यामुळे काही प्रमाणात बंधाऱ्यात पाणी शिल्लक आहेत. एकीकडे शासन जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात असतांना दुसरी कडे ठेकेदार आणि शासकीय बाबूंच्या नाकर्तेपणामुळे अशाप्रकारे शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ होत आहे.