नाशिक : कोरोनाबाबत नियमांचं काटोकोरपणे पालन करा, अन्यथा खबरदारी म्हणून कठोर पाऊलं उचलावे लागतील असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनची वेळ येऊ नये, म्हणून नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी केलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दररोज 150 ते 200 रुग्ण कोरोना बाधित येत आहेत. बधितांचा वाढता आकडा चिंताजनक आहे. जिल्हातील नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने हे रुग्ण वाढत असल्याचं पालकमंत्री यांनी सांगितलं आहे. तर राज्यातील काही भागात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अशी स्थिती नाशिक जिल्ह्यावर येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा प्रशासनाला कठोर पाऊल उचलावे लागू शकते. असा इशारा यावेळी छगन भुजबळ यांनी दिला आहे.
मुंबई, पुणेसह अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागात ही कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन चिंतेत आहे. कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे. पण नियमांकडे लोकांकडून कानाडोळा होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.