CET रद्द झाल्यानं प्रवेशाचं टेन्शन वाढलं, नामांकित कॉलेजसाठी प्रचंड रस्सीखेच

99 टक्क्यांवर विद्यार्थी पास झालेत आणि नामांकित कॉलेजची कटऑफ लिस्ट ही 95 टक्क्यांच्या वर राहील असा अंदाज आहे

Updated: Aug 11, 2021, 10:15 PM IST
CET रद्द झाल्यानं प्रवेशाचं टेन्शन वाढलं, नामांकित कॉलेजसाठी प्रचंड रस्सीखेच title=

किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : मुंबई उच्च न्यायालयाने CET रद्द केल्यामुळे आता दहावीच्या (SSC) मुल्यांकनाच्या आधारेच 11वीचे प्रवेश होणार, हे स्पष्ट झालंय. मात्र, यंदा सगळ्याच बोर्डांचा छप्परफाड निकाल लागलाय. 99 टक्क्यांच्या वर विद्यार्थी (Students) पास झालेत आणि 100 टक्क्यांच्या आसपास निकाल लागलेले हजारो विद्यार्थी आहेत. त्यामुळे नामांकित कॉलेजची (College) कटऑफ लिस्ट (Cutoff List) ही 95 टक्क्यांच्या वर राहील असा अंदाज आहे. त्यामुळे प्रवेशासाठी काँटे की टक्कर होणार, हे निश्चित आहे... 

विज्ञान आणि वाणिज्य शाखेत मोठी चुरस होणार आहे. काही कॉलेजमध्ये आर्ट्सची कटऑफ वाढण्याचीही शक्यता आहे. यंदा अनेक कॉलेजमध्ये पहिली कटऑफ लिस्ट 99 टक्क्यांच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. त्यामुळे 90 टक्क्यांच्या आसपास मार्क असलेल्यांनाही दुसऱ्या किंवा तिस-या लिस्टपर्यंत थांबावं लागू शकतं. एवढं करून आपल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळेलच, याची खात्री देता येत नाहीये. 

दरवर्षी 10वीच्या मार्कांवर कॉलेज प्रवेश होतात. मात्र तेव्हा परीक्षा झालेली असते. यावेळी केवळ मुल्यांकनाच्या आधारे मार्क देण्यात आलेत. त्यामुळे CET झाली असती, तर अधिक योग्य ठरलं असतं, असं काही पालकांचं म्हणणं आहे. 

दुसरीकडे, एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी (Education News) दिलीये.  गरज पडल्यास संख्या वाढवू, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, तसंच सीईटी शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळेल, तो त्यांचा अधिकार आहे, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

सरकार प्रवेशाची हमी देत असलं तरी हव्या असलेल्या कॉलेजमध्येच अॅडमिशन (Admission) मिळेल, याची शाश्वती नाही. 'एक अनार और सौ बिमार' अशी स्थिती झालीये. जागा कमी आणि विद्यार्थी जास्त या शिक्षणाच्या अव्यवस्थेत विद्यार्थी आणि पालक मात्र भरडले जात आहेत.