नागपूरात हवेत उडणारी बस! नितीन गडकरींचा सुतोवाच, मार्गही ठरला

पुणेकरांना आज मेट्रोची भेट मिळाली, त्यापाठोपाठ आता नागपुरकरांनाही मोठी भेट मिळणार आहे  

Updated: Mar 6, 2022, 06:14 PM IST
नागपूरात हवेत उडणारी बस! नितीन गडकरींचा सुतोवाच, मार्गही ठरला title=

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यातील प्रवासाला हिरवा कंदील दाखवत पुणेकरांना मेट्रोची भेट दिली. आता त्यापाठोपाठ नागपूरकरांनाही लवकरच मोठी भेट मिळणार आहे. नागपूरमध्ये लवकरच मेट्रोनंतर हवेत उडणारी बस (Flying Bus) दिसणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी तसा सूतोवाच केला आहे. 

नितिन गडकरी यांनी नागपुरात हवेतून उडणारी बस अर्थात केबल बस सुरु करण्याचं सूतोवाच केलंय. त्यासाठी DPR तयार करण्याचे निर्देशही गडकरींनी दिले आहे. उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपुरात ही हवेतून चालणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. 

35 ते 40 सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्स मध्ये चालवली जाते. त्याच धर्तीवर नागपुरात ही केबल बस सुरू केली जाईल. ही बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल आणि तिथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्स वरून वाडी आणि  व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत जाईल असंही त्यांनी सांगितलं.

प्रयागराजमध्ये हवेतून चालणाऱ्या या बसचा पहिला प्रयोग केला जाणार आहे. रोप-वेप्रमाणे एका जाडजूड केबलवरून बस पुढे सरकेल. त्यासाठी मोठमोठ्या खांबांवर स्थानकं बांधली जातील.  हवेतूनच बस जाणार असल्यामुळे ट्रॅफिकची कटकटही कायमची टळेल, असं गडकरींचं म्हणणं आहे.

उडणारी कार किंवा टॅक्सी देशात येईल तेव्हा येईल. मात्र आता हवेतून चालणारी केबल बस लवकरच येईल. हा प्रयोग राबवल्यास मुंबई-पुण्यासारख्या शहरांची वाहतूक समस्या सुटायला देखील मदत होईल. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आता या उडणाऱ्या बसकडे आहे.