मुंबई / नागपूर / हिंगोली : Central government gives Y level security to pro-Eknath Shinde MPs : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटताना आता दिसून येत आहे. शिवसेनेत मोठी फूट पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आता शिवसेनेचा खासदार शिंदे गटात जात आहेत. जवळपास 12 खासदार शिंदे गटात दाखल होत आहेत. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून या खासदारांना Y दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. आज दुपारनंतर शिंदे आणि समर्थक खासदारांची पत्रकार परिषद होत आहे.
खासदार कृपाल तुमाने यांच्या घराची सुरक्षा वाढवली गेली आहे. शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य खासदारांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. खासदारांचं कार्यालय, घराला पोलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने नागपूरच्या रामटेकचे खासदार आहेत.
शिवसेनेचे खासदार बंड करुन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात. या शक्यतेनंतर महाराष्ट्रात शिवसेनेच्या खासदारांच्या घरासमोर आणि कार्यालयासमोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. नागपुरात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
हिंगोलीचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांच्या नांदेड इथलं निवासस्थान आणि बँकसमोर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. खासदार हेमंत पाटील हे मूळचे नांदेडचे आहेत. खासदार हेमंत पाटील शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील होणार अशा पोस्ट काल सोशल मीडियावर फिरल्या होत्या. त्यांनतर त्यांचे नांदेड येथील तरोडा भागातील निवासस्थान आणि त्यांच्या गोदावरी अर्बन पथसंस्थेसमोर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
काल रात्रीपासून हा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कालपासून खासदार हेमंत पाटील यांचे फोन बंद असून ते नॉट रिचेबल असल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान ह्या अफवा असून कुठल्याही पोस्टवर विश्वास ठेऊ नये अश्या काही पोस्ट त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर टाकून आवाहन केले आहे.
शिवसेना खासदार धैर्यशील माने हे आता शिंदे गटाला जाऊन मिळत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत सर्व खासदारांकडून पत्रकार परिषद ही घेण्यात येणार आहे. मात्र या अगोदरच हे शिवसेना खासदार धैर्यशील माने यांची एक ऑडिओ क्लिप आता व्हायरल होत आहे. याबद्दल त्यांनी पुढे काय होणार आहे, असे माहित नाही मात्र आता प्रवाहासोबत जाणे चांगले असल्याचे म्हणत आहेत.