दुष्काळ निवारणासाठी राज्याला केंद्राकडून २ हजार कोटींची मदत जाहीर

मतदान संपल्यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून या भागाचे दौरे सुरु झाले आहेत.

Updated: May 7, 2019, 08:21 PM IST
दुष्काळ निवारणासाठी राज्याला केंद्राकडून २ हजार कोटींची मदत जाहीर title=

मुंबई: राज्याच्या दुष्काळी भागातील जनतेला मंगळवारी केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला दुष्काळ निवारणासाठी २ हजार १६० कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही घोषणा केली. यावेळी त्यांनी मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले. या ट्विटमध्ये फडणवीसांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी एनडीआरएफ, केंद्र सरकारकडून आणखी २१६० कोटी रूपये मदतीपोटी प्राप्त झाले. आतापर्यंत केंद्राने दुष्काळ निवारणासाठी राज्याला ४२४८.५९ कोटी रुपये दिल्याची माहितीही यावेळी फडणवीसांनी दिली. 

उन्हाळा सुरु झाल्यापासून राज्याच्या ग्रामीण भागात दुष्काळाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. राज्य सरकारने यापूर्वीच १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. अनेक ठिकाणी आतापासूनच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. तसेच गुरांना खाण्यासाठी चारा नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. मतदान संपल्यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून या भागाचे दौरे सुरु झाले आहेत. मात्र, त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेला प्रत्यक्ष दिलासा मिळताना दिसत नव्हता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळी उपाययोजनांसाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे नियम शिथिल करण्याची मागणीही केली होती. ही मागणी निवडणूक आयोगाने मान्यही केली. यानंतर दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात वॉररूमही स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या परिस्थितीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची लढाई सुरु झाली आहे.