औरंगाबाद : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस स्थानकात राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये 1 मे रोजी राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली होती. या सभेला काही अटी शर्थी लावण्यात आल्या होत्या. तब्बल 16 अटी लावण्यात आल्या होत्या. यातल्या काही अटींचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देखील राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा झाल्याची माहिती आहे.
मनसे आंदोलनावर ठाम
दरम्यान, मनसे उद्याच्या आंदोलनावर ठाम आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषेत पत्रक काढून मनसे आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशभरातील हिंदू बांधव आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्ते यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळतेय.
मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा
दुसरीकडे उद्याचं आंदोलन लक्षात घेता गृहविभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. मनसे नेते बाळा नांदगावर, संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्यासह राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. औरंगाबादमध्ये मनसेच्या 3 शहराध्यक्षांसह 40 जणांना कलम 149 अन्वये गुन्हा प्रतिबंधक नोटीस पाठवण्यात आली आहे.
गृहविभाग अॅक्शनमोडमध्ये
राज्यात कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी कठोर पावलं उचला, असे आदेश गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिलेत. जे कायदा सुव्यवस्था बिघडवतील, त्यांना ताब्यात घेतलं जाईल, तसंच तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेत. गृहमंत्र्यांनी राज्यातल्या पोलिसांची बैठक घेतली. त्यामध्ये पोलिसांनी हे आदेश देण्यात आलेत.