पुणे : पालखी सोहळ्यादरम्यान बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी सांगलीच्या शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे गुरुजींसह त्यांच्या सुमारे १००० कार्यकर्त्यांवर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी पुण्यात दाखल झाला. यावेळी माऊलींची पालखी गुडलक चौकात आली असताना संभाजी भिडे गुरुजींचे तलवारधारी कार्यकर्ते पालखीमध्ये सामील झाले. मात्र वारकऱ्यांनी त्यावर आक्षेप घेत त्यांना बाहेर काढण्याची विनंती पोलिसांना केली. त्यावरून जवळ जवळ अर्धा तास वाद रंगला. त्यामुळे तेवढा वेळ माऊलींची पालखी एकाच जागेवर होती.
अखेर पोलिसांच्या मध्यस्तीनंतर भिडे गुरुजींचे कार्यकर्ते बाहेर पडले आणि पालखी मार्गस्थ झाली. त्यादरम्यान भिडे गुरुजींच्या कार्यकर्त्यांनी डेक्कनवरील संभाजी पुतळ्याजवळ एकत्र येत घोषणाबाजी केली. त्यावरून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.