सुट्टयांमध्ये बाहेर फिरायला जायचा प्लान करताय? सावधान! हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली अशी होते फसवणूक

Pune Holiday Package Fraud: मुलांना शाळेच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत आणि अनेक जणांनी बाहेरगावी फिरायला जायचा प्लान बनवला असेल. पण याचा फायदा घेत सामान्य माणसाची लाखो रुपयांची फसवणूक केली जात आहे

राजीव कासले | Updated: May 1, 2023, 07:41 PM IST
सुट्टयांमध्ये बाहेर फिरायला जायचा प्लान करताय? सावधान! हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली अशी होते फसवणूक title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मुलांच्या परीक्षा संपल्यात आणि सुट्टीचा हंगाम (Holiday Season) सुरु झाला आहे. सुट्टीत आपल्या मुलाबाळांना घेऊन परदेशात फिरायला जाण्याचा प्लान (Plan to Travel Abroad) अनेकांनी केला असेल. यासाठी चागंले हॉलिडे पॅकेजचे (Holiday Package) प्लान पाहात असतो. पण याचाच फायदा घेत लाखोंची लूट होत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यात हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली पुणेकरांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचं उघड झालंय. 

काय आहे नेमका प्रकार?
पुणे शहरात विविध मॉल तसंच डी मार्ट आणि पेट्रोल पंपावर हातात कूपन घेऊन काही तरुण-तरुणी हे उभे असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून गिफ्ट कूपन (Gift Coupon) भरुन घेतात. पुणे शहरातील विविध भागात राहणाऱ्या अनेक नागरिकांकडून कूपन भरण्यात आलं. त्यानंतर एक दोन दिवसांनी त्यांना गिफ्ट लागल्याचा कॉल करुन कार्यालयात बोलावून घेतलं गेलं.

जेनियल इन्फो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून पुणे शहरातील विविध ठिकाणच्या नागरिकांकडून डी मार्टच्या बाहेर कूपनवर नाव नंबर घेण्यात आले आणि त्यांनंतर तुम्हाला गिफ्ट लागलं आहे अस सांगून या नागरिकांना या कंपनीच्या कार्यालयात बोलावलं गेलं या ठिकाणी त्यांना एक छोटंस गिफ्ट देखील देण्यात आलं. तिथेच त्यांना हॉलिडे पॅकेजचं आमिष दाखवण्यात आलं. सुट्टीसाठी जाण्याआधी 45 दिवस आधी बुकिंग करा असंही या लोकांना कंपनीकडून सांगण्यात आलं. पण जेव्हा लोकांनी बुकिंग केलं त्यावेळी त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

पुणयातील कल्याणीनगर आयटीपार्क इथं मागील तीन महिन्यांमध्ये हा प्रकार घडला आहे. जेनीयल लिमिटेड या कंपनीच्या पुण्यातील संचालकांवर या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला खरेदीसाठी एका मॉलमध्ये गेली होती. तिथे एका तरुणाने त्यांच्याकडून एक कार्ड भरून घेतलं. या कार्डद्वारे डिस्काऊंट आणि इतर फायदे मिळतील असंही त्यांना सांगण्यात आलं. 

दोन दिवसांनी दोन दिवसांनी या महिलेला सेरेब्रेम बिल्डिंग आयटीपार्क, कल्याणीनगर इथून फोन आला. महिलेला पतीसह या ठिकाणी बोलाविण्यात आलं. हॉलिडे पॅकेज देण्याचे आमिष दाखवून या महिलेकडून तब्बल 2 लाख 36 हजार रुपये घेण्यात आले. क्रेडिट कार्डवरुन या जोडप्याला अडीच लाख रुपयांचं हॉलिडे पॅकेज जबरदस्तीने देण्यात आलं. पण जेव्हा त्यांनी बुकिंग केलं, तेव्हा कंपनीकडून कोणतंच उत्तर देण्यात आलं नाही. याबाबत शहरातील विविध ठिकाणच्या या नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश माझिरे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली.

अशी घ्या खबरदारी..
कोणत्याही मॉलमध्ये खरेदीला गेल्यानंतर तेथे काही व्यक्तींकडून एका कार्डवर वैयक्तिक माहिती भरून घेतली जाते. त्यामध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर, उत्पन्न, कौटुंबिक माहिती घेतली जाते. त्यानंतर संपर्क करून विविध प्रलोभने दाखविली जातात. त्यामुळे अशा प्रकारे कोणत्याही कार्डवर स्वत:ची माहिती लिहून देऊ नये. तसंच अनोळखी कंपनीतून संपर्क साधल्यानंतर त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करताना कंपनीची सर्व माहिती पडताळून पाहावी. आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी त्या कंपनीची माहिती संबंधित सेवा पुरविणाऱ्या शासकीय वेबसाइटवर पडताळून पाहावी. अथवा संबंधित सेवा पुरविणाऱ्या अन्य कंपन्यांशी पैशांबाबत चाचपणी करावी