कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजीला जोर

प्रचाराची वेगवेगळी शक्कल 

Updated: Jan 22, 2021, 10:07 PM IST
कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजीला जोर title=

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीच्या तोंडावर बॅनरबाजीला काही दिवसांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्यानं अनेक नेते प्रचाराची वेगवेगळी शक्कल लढवत आहेत. त्यामुळे बॅनरबाजीला ही चांगलाच जोर आला आहे. कल्याणच्या रस्त्यावर  बॅनरवर पती पत्नी असे दोघांचे फोटो झळकत आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमाचा सपाटाही लावलेला दिसून येतो आहे. अजून वॉर्डाचे आरक्षण जाहिर झालेले नाही. त्यामुळे महिला आरक्षण पडल्याची चिंता अनेकांना लागून राहिली आहे. त्यामुळे नगरसेवक पतींच्या पत्नीचे बॅनवर झळकत आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक कोरोनामुळे लांबली आहे. निवडणूक कधीही लागू शकते. त्यामुळे नगरसेवक आणि इच्छूक उमेदवार आता कामाला लागले आहेत. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आरक्षण अजून जाहीर झालेलं नाही. त्यामुळे अनेक जण संभ्रमात आहेत. मत मिळवण्यासाठी श्रेयाचे राजकारण सुरु झाले आहे. एकीकडे विद्यमान नगरसेवक पुन्हा तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्याचा प्रयत्न करत आहेत.

मनसे आणि भाजप काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे. कारण राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याने वेगळे लढले तरी ते पुन्हा सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात. पण त्याआधी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.