मुंबईलगतच्या शहरातील एका बस स्थानकाला दिले 'बांगलादेश'चे नाव, कारण...

Bus Stop in Mira Bhayander Named  Bangladesh: मिरा-भाईंदर येथील एका वसाहतीचे नाव बांगलादेश म्हणून देण्यात आले आहे. त्यामुळं स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2023, 02:54 PM IST
मुंबईलगतच्या शहरातील एका बस स्थानकाला दिले 'बांगलादेश'चे नाव, कारण...  title=
Bus stop in Maharashtra s Thane district named Bangladesh by civic body

भाईंदरः मुंबईलगत असलेल्या भाईंदर (Bhayandar) शहरातील एका बस स्टॉपचे नाव 'बांगलादेश' (Bangladesh) ठेवण्यात आले आहे. बसस्टॉपचे नाव बदलण्यात आल्याने मोठा गदारोळ माजला आहे. भाईंदर पश्चिम येथे असलेल्या उत्तन चौकातील परिसरात असलेल्या बस स्टॉपला हे नाव देण्यात आले आहे. महनगर पालिकेनेच हा कारनामा केल्याचे उघड झाली आहे. 

उत्तन नगरमधील एका परिसराला बांग्लादेश हे उपनाम देण्यात आले आहे. कारण या परिसरात बांग्लादेशातून आलेले निर्वासित नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळं अनेकजण हा भागाला बांग्लादेश असं म्हणतात. मात्र, पालिकेने बस थांब्यालाच बांग्लादेश असं नाव दिल्याने मोठी खळबळ माजली आहे. पालिकेने हे नाव दिल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी नोंदवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसराचे मूळ नाव इंदिरा नगर आहे. भाईंदर पश्चिममध्ये समुद्र किनारा आहे. त्यामुळं इथे मोठ्या प्रमाणात माच्छिमार बांधव राहतात. इथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. सुरुवातीला इथे मासे पकडण्यासाठी कामगारांची गरज भसत होती. त्यावेळी पश्चिम बंगालमधून अनेक जण कामाच्या शोधात इथे आले होते. कालांतराने ते तिथेच स्थायिक झाले. 

भाईंदरच्या पालीचौकात ही मूळ वस्ती आहे. मात्र तिथे राहत असलेल्या कामगारांची भाषा बांग्ला होती. त्यामुळं या वस्तीला बांग्लादेश वस्ती म्हणूनही ओळखलं जाऊ लागले. पुढे भाईंदरमध्येही याच नावाने ही वस्ती ओळखली जाऊ लागली. 

स्थानिकांनी केली नाव बदलण्याची मागणी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रयत्नाने पूर्व पाकिस्तान पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त केला. त्यानंतर बांगलादेशची स्थापना झाली. 1971 साली बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली. त्याचमुळं भाईंदरमधील त्या वसाहतीचे नाव इंदिरानगर ठेवण्यात आले होते. मात्र, कालांतराने ती वस्ती बांगलादेश नावाने लोकप्रिय होऊ लागली. 

इतकंच नव्हे तर, या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांच्या आधार कार्ड, लाइट बिल आणि नगरपालिकेच्या घरांवरही बांगलादेश हेच नाव लिहण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे मीरा- भाईंदर महापालिकेला याबाबत कोणतीही माहिती नव्हती. 

नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथे असलेल्या बसस्टॉपचे नावही आता बांगलादेश असं केले आहे. त्यामुळं इथे राहणाऱ्या स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. स्थानिकांनी यावर आक्षेप घेत नाव तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे. 

स्थानिक निवासी धर्मेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही इथे 25 वर्षांपासून राहतो. या परिसराचे नाव गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश असं म्हटलं जात आहे. मात्र, हे चुकीचे आहे. यात बदल झाला पाहिजे. याच परिसरात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याच्या नावाने या परिसराचे नामांतर व्हावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.